सावधान! नाशिकमध्ये तोतया पोलिसांचा हैदोस...

Share:
Last updated: 05-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ फेब्रुवारी - शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट झाला असून, सुरक्षेची बतावणी करत वयोवृद्धांना लुटण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. सोमवारी (दि. २) भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ महिलांना लुटण्यात आले. भामट्यांनी मदतीचा बहाणा करून सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे अलंकार हातोहात लांबवले आहेत.

पहिली घटना: औषधे आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेला ९० हजारांचा गंडा
टाकळी रोड परिसरातील रशिदा मोईज डॉक्टर (७६) या सोमवारी दुपारी औषधे खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. जेजूरकर गल्लीतून पायी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अडवले. त्याने आपण पोलीस असल्याचे सांगून परिसरात चोरीच्या घटना घडत असल्याचे भासवले आणि अंगावरील दागिने काढून ठेवण्याचा सल्ला दिला. मदतीचा बहाणा करत या भामट्याने ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी कागदात गुंडाळून देण्याच्या बहाण्याने पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

दुसरी घटना: 'चाकू दाखवून लूट झालीय' अशी भीती घालून १.८० लाखांची चोरी
दुसरी घटना चोपडा लॉन्स परिसरात घडली. जयश्री शंकरराव चांदगुडे (७५, रा. गंगापूर रोड) या दुपारी पाय मोकळे करण्यासाठी फिरत असताना ट्रॅव्हल्स ऑफिससमोर दोन भामट्यांनी त्यांना गाठले. "पुढच्या गल्लीत एका महिलेला चाकू लावून लुटले आहे, तुम्ही सोने घालून फिरू नका," अशी भीती त्यांनी घातली. चांदगुडे यांनी विश्वासाने आपली १ लाख ४० हजार रुपयांची सोन्याची पोत (पावणेतीन तोळे) आणि ४० हजारांची अंगठी काढून दिली. भामट्यांनी ते दागिने कागदात गुंडाळून साडीच्या पदराला बांधत असल्याचे नाटक केले आणि काही वेळातच तिथून पोबारा केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हवालदार खोडे तपास करत आहेत.

पोलीस आवाहन: नाशिककरांनी रस्त्याने चालताना पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. पोलीस कधीही रस्त्यावर कोणाचेही दागिने काढायला सांगत नाहीत. असा प्रकार घडल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Advertisement

Comments

No comments yet.