नाशिकमध्ये 'बंटी-बबली'चा सुळसुळाट... असा झाला भांडाफोड...

Share:
Last updated: 04-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ फेब्रुवारी - शहरात नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक होऊ पाहणाऱ्या दोन भावांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालकी हक्क नसतानाही ताबेगहाण पद्धतीने फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका 'बंटी-बबली'च्या जोडीने जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भामरे बंधूंना ३ लाख ५० हजार रुपयांना लुटले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला प्रकार
मूळचे रांजनगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील योगेश मधुकर भामरे आणि त्यांचे बंधू राहुल भामरे हे नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. नाशिकमध्ये स्वतःचे हक्काचे घर असावे या उद्देशाने ते सदनिकेचा शोध घेत होते. मार्च २०२३ मध्ये एका एजंटमार्फत त्यांची ओळख माधुरी धनगर (रा. कामटवाडा) आणि स्वप्निल सुभाष सानप (रा. सिडको) यांच्याशी झाली.

बनावट मालकी हक्काचा बनाव
संशयितांनी भामरे बंधूंना मुरलीधरनगर येथील 'लंबोधर हाईटस'मध्ये एक सदनिका दाखवली. यावेळी माधुरी धनगर हिने हा फ्लॅट आपल्याच मालकीचा असल्याचे भासवले. फ्लॅट भाड्याने न देता 'ताबेगहाण' (Possession Mortgage) पद्धतीने देण्याचा व्यवहार ३ लाख ५० हजार रुपयांत निश्चित झाला. नोटरीद्वारे करारनामा करून भामरे यांच्या आईच्या खात्यातून ही रक्कम आरटीजीएसद्वारे सानप याच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.

बँक नोटिशीमुळे फुटले भांडे
काही दिवसांनंतर संबंधित फ्लॅटच्या दरवाजावर एका बांधकाम कंपनीची जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली. यामुळे भामरे बंधूंना धक्का बसला. त्यांनी सखोल चौकशी केली असता, तो फ्लॅट अभिमान साळवे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तो फ्लॅट जप्त करण्यात आला होता.

कारवाईचा बडगा
जेव्हा भामरे बंधूंनी पैसे परत मागितले, तेव्हा संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे देत पैसे देण्यास नकार दिला. अखेर २४ सप्टेंबर २०२४ रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार कंपनीने फ्लॅटचा प्रत्यक्ष ताबा घेतला आणि भामरे बंधूंना घर सोडावे लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलीस तपास: या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी माधुरी धनगर आणि स्वप्निल सानप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.