दुकानासमोर टाचण्या टोचलेले लिंबू आणि पूजा साहित्य... सराफ व्यावसायिकावर जादूटोण्याचा प्रयोग...

Share:
Main Image
Last updated: 01-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी - शहरातील म्हसरूळ परिसरात एका सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबाला जादूटोणा करून दहशतीखाली ठेवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने पीडित कुटुंबाच्या घराबाहेर आणि दुकानासमोर टाचण्या टोचलेले लिंबू आणि पूजेचे साहित्य फेकून भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, श्यामराव छगनराव बिरारी (रा. सप्तशृंगी बंगला, कलानगर, म्हसरूळ) हे सराफ व्यावसायिक असून त्यांचे घर आणि दुकान एकाच परिसरात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरासमोर वारंवार तांदूळ, पूजेच्या सुपार्‍या आणि तेजपत्ते पडलेले आढळत होते. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले, मात्र काही दिवसांपासून टाचण्या टोचलेले लिंबू आढळू लागल्याने बिरारी कुटुंब प्रचंड घबराटीखाली आले होते.

पोलीस कारवाई आणि अटक
दिवसाआड घडणाऱ्या या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या बिरारी कुटुंबाने अखेर म्हसरूळ पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. पेहरावावरून संशयित आकाश दिनकर साळवे (२८, रा. मखमलाबाद) याला ताब्यात घेतले असता, त्याने केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची कबुली दिली.

अंनिसची आक्रमक भूमिका: मांत्रिकाला सहआरोपी करा
या घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की,
"तथाकथित जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीला अटक झाली असली, तरी हे कृत्य करण्यास त्याला एका महिला मांत्रिकाने चिथावणी दिल्याचे समजते. पोलिसांनी सखोल तपास करून त्या मांत्रिकाचा शोध घ्यावा आणि तिलाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे."

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहेत. या घटनेमुळे परिसरात अंधश्रद्धेच्या प्रकारांबाबत चर्चा सुरू झाली असून, नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना किंवा भीतीला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.