णमोकार तीर्थ महोत्सव... चांदवडला येणार देशभरातून लाखो जैन बांधव...

Share:
Main Image
Last updated: 31-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३१ जानेवारी - मालसाणे, ता. चांदवड येथे होणाऱ्या णमोकार महोत्सवासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता बाळगावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज सकाळी णमोकार तीर्थ येथे भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, णमोकार महोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील. त्यांच्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महोत्सव सुरू होण्यापूर्वी त्यांची चाचणी करून घ्यावी. महोत्सव परिसरात नियमितपणे स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी णमोकार तीर्थ येथे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तत्पूर्वी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी हेलिपॅड, वाहनतळ, मुख्य मंडप, पाणीपुरवठा व स्वच्छता आदी कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी णमोकार तीर्थ समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

लाखो जैन बांधव येणार
या तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने विकास आराखडा राबविण्यात यावा. हे ठिकाण जैन धर्मियांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून 10 ते 15 लाख भाविक येतील.

णमोकर तीर्थ विकास आराखडा
जैन धर्मस्थळ असून नाशिक – धुळे महामार्गावर मौजे मालसाने गावाजवळ 40 एकर भूभागावर स्थित आहे. आराखडा अंतर्गत णमोकार तीर्थ क्राँकिट रस्ता तयार करणे, संरक्षक भिंत बांधकाम, नौकायन बांधकाम, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छतेसाठी कामे करण्यात येणार आहे. तसेच ठिकाणी 6 ते 25 फेब्रुवारी 2026 कालावधीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पाण्याच्या टाक्या बसविणे, 450 युनिट टॉयलेट ब्लॉक उभारणी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, तात्पुरती वैद्यकीय युनिट स्थापना करण्यात येणार आहे.

णमोकार तीर्थ महोत्सवाची सुरवात नाशिक जिल्ह्यातून होत असल्यामुळे कुंभमेळ्याच्या धर्तीवर या महोत्सवाला धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त होणार आहे. नाशिकसाठी ही अभिमानास्पद बाब असून हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह सेवाभावी, धार्मिक संस्था व नागरिक यांचे योगदान आवश्यक आहे. हा महोत्सव 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात भाविक, पर्यटक व अति महत्त्वाच्या व्यक्ती येथे भेट देणार आहेत. यासाठी सर्व यंत्रणांनी व्यवस्था चोख राहील, या दृष्टीने दक्ष राहावे. यासाठी यंत्रणांनी आवश्यक मनुष्यबळ वाढवून कामांना गती द्यावी. तीर्थाच्या ठिकाणी हेलिपॅडचे कामकाज, दर्शनी भागातील कुंपण भिंतकाम वेळेत पूर्ण करावे. यासह आकर्षक सुशोभीकरण, पर्यटक बोट व्यवस्था व आवश्यक परवानग्या, पार्किंगची व्यवस्था, गर्दीचे सुयोग्य नियोजन करावे. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन पाणी, वीज, फिरती स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व मैला व्यवस्थापन, भाविक व पर्यटक निवास व्यवस्था करण्यात यावी. महोत्सव काळात आरोग्य विभागाने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, हॉस्पीटल, तात्पुरते वैद्यकीय कक्ष, खाटा, औषधसाठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी 24x 7 नियुक्त करण्याच्या सूचना डॉ. गेडाम यांनी दिल्या.

Advertisement

Comments

No comments yet.