महिलांसाठीच्या या सरकारी मोहिमेसाठी नाशिकची निवड

Share:
Main Image
Last updated: 30-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जानेवारी - महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा विस्तार सुरू असून, पुणे आणि सातारा जिल्ह्यानंतर आता नाशिक जिल्ह्याचाही अधिकृत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात लवकरच या अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.

देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. दर ८ मिनिटांनी एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागत आहे. दररोज सुमारे २०० महिलांचा मृत्यू होत आहे. हा कर्करोग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. मात्र, वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे लवकर जागरूकता, वेळेवर प्रतिबंध आणि ९ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण करून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा समूळ नायनाट करणे हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील लाखो मुलींच्या आरोग्याचे आणि भविष्यातील सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी एक व्यापक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवे प्रारूप (मॉडेल) उभे राहत आहे. 

याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्री करीत आहोत. मुलींचे संरक्षण करणे हे आपले नैतिक आणि सामाजिक दायीत्व आहे. कॉर्पोरेट घटकांनी सीएसआरच्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढ्याला बळ द्यावे. 

या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये जीविका फाउंडेशन (जीविका हेल्थकेअर) राज्याचा अंमलबजावणी भागीदार (Implementing Partner) म्हणून काम करत आहे. शासनासोबत समन्वय साधून जनजागृती, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि समुदाय पातळीवर विश्वास निर्माण करण्यासाठी जीविका फाउंडेशन कार्यरत आहे. फाऊंडेशनचे संचालक जिग्नेश पटेल यांनी सांगितले की, राज्य शासनासोबत या अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य अभियानाचा भाग होण्याचा आम्हाला अभिमान आहे.

नाशिक जिल्ह्याच्या समावेशामुळे दहा प्राधान्य जिल्ह्यांमध्ये टप्प्या- टप्प्याने राबवण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला अधिक गती मिळणार असून, भविष्यात महाराष्ट्र गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एक आदर्श राज्य म्हणून उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.