गॅस गिझरच्या स्फोटाने ४० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Share:
Last updated: 30-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जानेवारी - शहरातील म्हसरूळ परिसरात गॅस गिझरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या ४० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगेश रमेश जाधव असे या मृत तरुणाचे नाव असून, गेल्या पाच दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसरूळ येथील रहिवासी असलेले मंगेश जाधव शनिवारी (दि. २४) सकाळी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. गरम पाण्यासाठी त्यांनी गॅस गिझर सुरू केला असता अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात मंगेश जाधव हे गंभीररीत्या भाजले गेले. स्फोटाचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
प्राथमिक उपचारानंतर जाधव यांना पुढील उपचारासाठी शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी (दि. २९) उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पोलीस तपास सुरू
या घटनेची नोंद म्हसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गॅस गिझरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बिघाड होता की गॅस गळती, याचा अधिक तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.

सुरक्षेचे आवाहन: थंडीच्या दिवसात गॅस गिझरचा वापर वाढतो. नागरिकांनी गिझरचे वेळोवेळी मेंटेनन्स करावे आणि बाथरूममध्ये व्हेंटिलेशनची (हवा खेळती राहण्याची) योग्य सोय ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

विवाहितेची आत्महत्या

नाशिक : आडगाव शिवारातील मानूर भागात राहणाºया २७ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंजूषा ज्ञानेश्वर जाधव (रा. सुमंगल लॉन्स समोर वेताळ बाबा मंदिर) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. मंजूषा जाधव यांनी गुरूवारी (दि.२९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या अ‍ँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती ज्ञानेश्वर जाधव यांनी त्यांना बेशुध्द अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.