नाशिकमध्ये तोतया पोलिसांचा पुन्हा धुमाकूळ... इतक्या लाखांचे दागिने लांबवले...

Share:
Last updated: 29-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ जानेवारी - शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट झाला असून, एकट्या-दुकट्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून दागिने लांबवणाऱ्या टोळीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिंडोरी रोड परिसरात भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला 'पुढे खून झाला आहे' अशी भीती घालून, तोतया पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या हातोहात लांबविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २७) घडली.

नेमका प्रकार काय?
दिंडोरी रोडवरील यमुना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लक्ष्मीबाई चंद्रकांत धोत्रे (७०) या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. रिलायन्स पेट्रोल पंपाकडून त्या बालाजी चौकाच्या दिशेने पायी जात असताना, कृष्णा हाईट्स इमारतीजवळ दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना गाठले. संशयितांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते.

भूलथापा देऊन घातला डल्ला
संशयितांनी 'आम्ही पोलीस आहोत' अशी बतावणी केली. "पुढे एकाचा खून झाला आहे, तुम्ही दागिने घालून पुढे जाऊ नका, ते काढून पिशवीत ठेवा," असा सल्ला त्यांनी लक्ष्मीबाई यांना दिला. मदतीचा बहाणा करत भामट्यांनी त्यांच्या हातातील चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि एका कागदात गुंडाळून देण्याचे नाटक केले. लक्ष्मीबाई यांनी घरी जाऊन ती कागदाची पुडी उघडली असता, त्यात सोन्याच्या बांगड्यांऐवजी प्लास्टिकच्या बांगड्या असल्याचे दिसून आले.

म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लक्ष्मीबाई यांचा मुलगा योगेश धोत्रे यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले. सुमारे २ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गावीत या प्रकरणाचा तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोतया पोलिसांचा शोध घेतला जात आहे.

नागरिकांना आवाहन:
पोलीस कधीही रस्त्यावर दागिने उतरवून ठेवण्यास सांगत नाहीत. अशा प्रकारे कोणी पोलीस असल्याची बतावणी करून दागिने मागितल्यास तात्काळ सावध व्हावे आणि जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Advertisement

Comments

No comments yet.