नाशिक, (प्रतिनिधी) २८ जानेवारी - शिकवणी संपवून सायकलने घराकडे परतणाऱ्या १६ वर्षीय शाळकरी मुलाला भरधाव कारने चिरडल्याची हृदयद्रावक घटना आडगाव शिवारातील गणेश मार्केट चौफुली भागात घडली. या भीषण अपघातात अर्जुन सतीश जगताप या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासत कारचालकाने जखमी मुलाला मदत करण्याऐवजी तिथून पळ काढला.
नेमकी घटना काय?
मृत अर्जुन जगताप (रा. कल्याणी रो-हाउस, स्वामी समर्थ नगर) हा सोमवारी (दि. २६) नेहमीप्रमाणे क्लासला गेला होता. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास क्लास सुटल्यानंतर तो सायकलने घराकडे निघाला होता. गणेश मार्केट चौफुलीवरील सेल्फी पॉईंट हॉटेलसमोर तो रस्ता ओलांडण्यासाठी आपली सायकल घेऊन थांबलेला होता. त्याचवेळी गणेश मार्केटकडून नांदूर रोडच्या दिशेने वळण घेणाऱ्या एका कारने अर्जुनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अर्जुनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच प्राण गेला.
चालकाचे पलायन आणि गुन्हा दाखल
अपघात झाल्यानंतर कारचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीने जखमी मुलाला दवाखान्यात नेण्याचे सौजन्य न दाखवता कारसह घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मृताचे वडील सतिश जगताप यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कारचालक पुष्कर बागुल आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार आहिरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
स्थानिकांचा संताप: या परिसरात वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एका निष्पाप विद्यार्थ्याचा असा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच
नाशिक - शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सातपूर कॉलनीतील शशिकांत हरिशंकर विश्वकर्मा (रा.बिल्डींग नं.१ महाराष्ट्र हौ.सोसा.) हे गेल्या सोमवारी (दि.१९) रात्री रामवाडी भागात गेले होते. गोदापार्क परिसरात लावलेली त्यांची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. विलास शिवाजी मुठाळ (रा.उमंगनाथ अपा.गजानननगर,पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मुठाळ यांची मोटारसायकल शनिवारी (दि.२४) ज्ञानेश्वरनगर येथील मोहन स्विट भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत. तिसरी घटना देवळाली गावात घडली. मंगेश ज्ञानेश्वर लांडगे (रा. शैनेश्वर चौक,मौलाना आझाद रोड देवळालीगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लांडगे यांची गाडी सोमवारी (दि.२६) रात्री त्यांच्या घरासमोरून पळवून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.