कुंभमेळ्यात सामाजिक कार्य केल्यास विद्यार्थ्यांना हे मिळणार... पुणे विद्यापीठाचा निर्णय…

Share:
Main Image
Last updated: 27-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ जानेवारी - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दिशादर्शक तत्वांनुसार, कुंभमेळ्यात स्वयंसेवक, शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यासाठीचे दोन अकॅडमिक क्रेडिट (गुण) देण्यात येणार आहे. यासंबंधीच्या ठरावाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अशा प्रकारे “कुंभमेळा अकॅडमिक क्रेडिट बँकशी जोडणारे” पुणे विद्यापीठ देशात पहिले विद्यापीठ ठरण्याची शक्यता आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी मे-२०२५ मध्ये विद्यापीठाकडे या संबंधीची मागणी केली होती. गेली वर्षभर यासाठी पाठपुरावा सुरू होता. नाशिक येथे २०२६-२७ दरम्यान होणारा कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येणारा एक राष्ट्रीय स्तरावरील भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असून, या सोहळ्यास लाखो भाविक देशभरातून तसेच परदेशातूनही भेट देतात. या महाउत्सवात विद्यार्थ्यांची विविध कार्यक्षेत्रांमध्ये जसे की, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन ,आरोग्य सेवा , सीसीटीव्ही नियंत्रण, माहिती तंत्रज्ञान, NCC, NSS, संशोधन, सुरक्षा, पर्यावरण, नदी संवर्धन आदी अनेक व्यवस्थापकीय कार्ये यात मदत घेता येईल. किंबहुना यापूर्वीच्या कुंभमेळ्यात स्वयस्फूर्तीने विद्यार्थी शिक्षक घटकांनी असे योगदान दिलेलेही आहे. 

विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे प्रशासनाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना नागरी शिस्त, संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आणि सामाजिक जबाबदारी यासारख्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळेल. अशा प्रकारच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. यास अकॅडमिक क्रेडिट बँकशी जोडल्यास एक नवा शैक्षणिक प्रयोग होईल, असे वैद्य यांनी मागणीत म्हटले होते. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, सर्व मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर, अधिकार मंडळे आदींनी त्या अनुषंगाने वेळोवेळी विविध मान्यता दिल्या. नाशिक कुंभमेळ्यामध्ये सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याच्या स्वरूपानुसार अकॅडमिक क्रेडिट्स प्रदान केल्याने NEP चा यथोचित उद्देशही सफल होईल आणि विद्यार्थ्यांसाठी हा केवळ धार्मिक उत्सवातील सहभाग न राहता शैक्षणिक उपक्रमही ठरून त्यांच्या भारतीय ज्ञान परंपरेत वाढ होईल. शिक्षक, शैक्षणिक संस्था यांनाही याचा मूल्यांकन वाढीसाठी उपयोग होईल, अशी विद्यापीठाची भूमिका आहे.

आगामी कुंभमेळा कार्यकाळात नाशिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. कुंभमेळा कालावधीसाठी हा निर्णय लागू असेल. 

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील या संकल्पनेला पाठिंबा दिला. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही यासाठी कौतुकास्पद पुढाकार घेतला. विद्यापीठाकडे पाठपुरावा केला. शैक्षणिक समन्वय समितीही याकामी स्थापन केली आहे.

२०१९ ला NEP आल्यानंतर अनेक राज्यात कुंभमेळे झाले. पण कुणीही असा प्रयत्न केल्याचे ऐकण्यात नाही. हा निर्णय झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातील एकमेव विद्यापीठ ठरेल.. याचा उपयोग हजारो विद्यार्थ्यांना होईल. आणि सामाजिक कामाला शैक्षणिक प्रतिष्ठा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आदींच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचा कुंभमेळा हा “शिक्षा-रोजगार-संस्कार” या त्रिसूत्रीवर करण्याचे नियोजन आहे.

Advertisement

Comments

No comments yet.