नाशिक (प्रतिनिधी) २८ नोव्हेंबर - शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि नेहमी वर्दळ असलेल्या संदीप हॉटेल परिसरात एका मद्यपी महिलेने भररस्त्यात मोठा गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत तर्र असलेल्या या महिलेने केवळ नागरिकांनाच नव्हे, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या महिला पोलिसांनाही धक्काबुक्की करत त्यांचे केस पकडून मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला असून, बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. अखेर अतिरिक्त महिला पोलीस बळ बोलावून या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर रोडवरील निलगिरी बाग परिसरात राहणारी एक ३३ वर्षीय महिला गुरुवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास मद्याच्या नशेत संदीप हॉटेल परिसरात आली होती. भररस्त्यात उभे राहून ती येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करत धिंगाणा घालत होती. वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ मुंबईनाका पोलीस ठाण्याला कळवली.
घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदार सोनाली थोरात या आपल्या दोन महिला सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. गोंधळ घालणाऱ्या महिलेला समजावून सांगण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न महिला पोलिसांनी केला. मात्र, पोलिसांना पाहताच संबंधित महिला अधिकच आक्रमक झाली.
महिला पोलिसांवर हल्ला आणि वाहतुकीचा खोळंबा
नशेत असलेल्या या महिलेने महिला पोलिसांशी हुज्जत घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. तिने अंमलदार सोनाली थोरात यांचे केस पकडून त्यांना ओढले, तसेच सोबत असलेल्या अन्य दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भरचौकात सुरू असलेल्या या हायव्होल्टेज ड्रामामुळे रस्त्यावरील नागरिकांनी एकच गर्दी केली. बघ्यांच्या या गर्दीमुळे संदीप हॉटेल परिसरातील वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली होती.
'निर्भया' पथकाची धाव आणि कारवाई
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुंबईनाका पोलीस ठाण्यातून तात्काळ 'निर्भया' व्हॅन आणि अतिरिक्त महिला पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पाचारण करण्यात आला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहताच गोंधळ घालणाऱ्या महिलेची पळापळ सुरू झाली. अखेर महिला पोलिसांनी आवश्यक बळाचा वापर करत या महिलेला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकरणी महिला अंमलदार सोनाली थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित ३३ वर्षीय महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक इनामके या घटनेचा पुढील तपास करत आहेत.