मटक्याचा धंदा... सुरगाण्याचे दोन पोलीस असे सापडले जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 27-Nov-2026

 

  नाशिक, (प्रतिनिधी) २७ नोव्हेंबर - अवैध मटक्याचा व्यवसाय कोणतीही आडकाठी न येता सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करणे सुरगाणा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना चांगलेच भोवले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सखोल पडताळणी केल्यानंतर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाईमुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

रमेश वाल्मीक चव्हाण (वय ३७, पोशि/३१२१, रा. कृष्णनगर, सुरगाणा) आणि जगदीश जानू घुटे (वय ३७, पोशि/२९५०, रा. गट नं. १००, सुरगाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन पोलीस शिपायांची नावे असून, हे दोघेही सुरगाणा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा चिखली येथे सुरू असलेला मटक्याचा धंदा निर्विघ्नपणे सुरू ठेवण्यासाठी पोलीस शिपाई रमेश चव्हाण याने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरगाणा बस स्थानक परिसरात तक्रारदाराची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान चव्हाण याने तक्रारदाराकडे तब्बल ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती त्याने २५ हजार रुपयांची मागणी करून त्यातील १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. या संपूर्ण घडामोडीवेळी तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या पोलीस शिपाई जगदीश घुटे याने चव्हाण याला लाच मागण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे.

लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची रीतसर पडताळणी केली असता, संबंधित कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून सुरगाणा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०३/२०२६) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ आणि कलम १२ अन्वये रमेश चव्हाण आणि जगदीश घुटे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एसीबी पथकाची कामगिरी आणि पुढील तपास

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्यासह पोहवा प्रफुल्ल माळी, विलास निकम, प्रभाकर गवळी आणि चापोशि समीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ करत आहेत.

नागरिकांना आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने किंवा लोकसेवकाने कामकाजासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ किंवा ०२५३-२५७५६२८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Comments

No comments yet.