गुजरातच्या कालव्यात जळगावच्या ६ जणांना फेकले... तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस...

Share:
Main Image
Last updated: 27-Nov-2026

 

जळगाव, (प्रतिनिधी) २७ नोव्हेंबर - गुजरातच्या कालव्यात जळगाव येथील एकाच कुटुंबातील सदस्यांना फेकून दिल्याच्या थरारक घटनेला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. कामाच्या शोधात गेलेल्या या कुटुंबावर अंधारात हल्ला करून त्यांना कालव्यात ढकलल्याची घटना केवळ अपघात नसून, तो पूर्वनियोजित कट आणि हत्याकांड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या हत्याकांडामागे ५० लाखांच्या विम्याची रक्कम आणि आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे असल्याचा मोठा खुलासा झाला आहे.

पाच जणांचा मृत्यू, एक मुलगा सुखरूप

मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या कारमधून आलेल्या चौघांनी पाटील कुटुंबाची कार अडवली आणि कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने खाली उतरवून खोल कालव्यात फेकले. या दुर्घटनेत पाच जणांचे मृतदेह हाती लागले असून त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. नितीन पाटील, कविता पाटील, श्रुती पाटील (वय ९), प्रथमेश पाटील (वय ३) आणि हरीश पाटील (वय १५) अशी मृत कुटुंबीयांची नावे आहेत. सुदैवाने या कुटुंबातील एक मुलगा बचावला असून तो सुखरूप आहे; त्याच्यामुळेच ही भयंकर घटना उघडकीस आली. या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमा घोटाळ्याशी संबंध आणि हत्येचे कारण

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात अपघाताचा बनाव करून ५० लाख रुपयांची विम्याची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील सात आरोपी सध्या अटकेत असून कारागृहात आहेत. विशेष म्हणजे, मयत नितीन पाटील आणि कविता पाटील हे दोघेही मेहुणबारे पोलीस ठाण्यातील या विमा फसवणूक गुन्ह्यात संशयित आरोपी होते. विमा कंपन्यांची फसवणूक करून मिळालेली १० लाख रुपयांची रक्कम मयत कविता हिच्याकडे होती. याच आर्थिक वादातून आणि रकमेच्या कारणावरून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

चांगल्या कामाचे आमिष दाखवून बोलावले

चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये बोलावले आणि त्यानंतर त्यांना लक्ष्य केल्याचे तपासात पुढे आले आहे. या संपूर्ण टोळीने अनेक घटनांमध्ये अपघाताचा बनाव रचून विमा कंपन्यांची मोठी फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

डॉक्टर, पोलिसांसह इतरांचा समावेश

या हत्याकांडाच्या तपासादरम्यान धक्कादायक नावे समोर येत असून, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये एक डॉक्टर, चार पोलीस कर्मचारी, एक विमा एजंट आणि इतर काही जणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्यांची संख्या आठ झाली असून, अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. मेहुणबारे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील सात आरोपींनाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरात हत्याकांडाच्या अनुषंगाने जळगाव पोलीस आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर आणि अधिकृत माहिती देणार आहेत.

 

Comments

No comments yet.