मुंबई (प्रतिनिधी) २८ नोव्हेंबर - आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवे बळ मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची नुकतीच सोशल स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला अधिक व्यापक व नियमबद्ध व्यासपीठ उपलब्ध झाले असून, गंभीर आणि महागड्या उपचारांसाठी अधिक निधी उभारण्यास मोठी मदत होणार आहे.
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी वाढती मागणी
महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, यकृतविकार, मेंदूविकार तसेच इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत मदतीसाठी अर्ज करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, सोशल स्टॉक एक्स्चेंजसारख्या आधुनिक व्यासपीठाचा वापर करून निधी संकलनाची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या माध्यमातून मिळणाऱ्या अतिरिक्त मदतीचा लाभ दुष्काळग्रस्त भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी होणार आहे.
सोशल स्टॉक एक्स्चेंज म्हणजे नेमके काय?
सर्वसाधारण शेअर बाजारात कंपन्यांचे समभाग खरेदी-विक्री केले जातात; परंतु सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी उपक्रमांसाठी निधी उभारणीचे विशेष व नियमबद्ध व्यासपीठ आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) येथे सेबीच्या (SEBI) नियमनाखाली हे व्यासपीठ कार्यरत आहे. पात्र ना-नफा संस्था येथे नोंदणी करून 'झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल' या माध्यमातून निधी उभारू शकतात आणि देणगीदारांना लोककल्याणकारी कामात थेट सहभागी होता येते.
मुख्यमंत्री सहायता निधीला होणारे प्रमुख फायदे
सोशल स्टॉक एक्स्चेंजवरील नोंदणीमुळे मुख्यमंत्री सहायता निधीला अनेक महत्त्वाचे लाभ मिळण्याची अपेक्षा आहे:
सीएसआर व मोठ्या देणगीदारांपर्यंत पोहोच: कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा प्रभावी वापर तसेच मोठे देणगीदार, फाउंडेशन आणि सामाजिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.
महागड्या उपचारांना हातभार: कर्करोग, हृदयरोग, किडनी व यकृत प्रत्यारोपण, मेंदूविकार आणि दुर्मिळ आजारांवरील महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ शकेल.
नवीन भागीदार व पारदर्शकता: कार्याची व्यापक माहिती पोहोचल्याने नवीन देणगीदार जोडले जातील. तसेच निधीच्या वापरातून किती लोकांपर्यंत लाभ पोहोचला आणि जीवनमानात काय सकारात्मक बदल झाले, याचा सामाजिक परिणाम मोजणेही शक्य होईल.
आरोग्य सेवेसाठी आधीपासूनच सुरू असलेले प्रयत्न
राज्यात गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्या व रुग्णालयांच्या सहभागातून त्रिपक्षीय निधी उभारणी तसेच स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्याचे काम यापूर्वीच सुरू आहे. शिवाय, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अतिरिक्त आर्थिक स्रोत उभे करण्यासाठी 'महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी'ची स्थापना करण्यात आली आहे.
महागड्या शस्त्रक्रियांची नोंदणी आणि कॉर्पोरेट सहभाग
आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, हा मुख्यमंत्री सहायता निधीचा मूळ उद्देश आहे. येत्या काळात दुर्मिळ, महागड्या आणि अत्याधुनिक शस्त्रक्रियांच्या खर्चाचे प्रस्ताव या नव्या व्यासपीठावर नोंदवले जातील. या माध्यमातून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग वाढून रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी स्पष्ट केले आहे.