येवला, (प्रतिनिधी) २५ जानेवारी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत येवला नगरपालिकेला १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून येवला नगरपालिका क्षेत्रात मराठी शाळांची गुणवत्ता वाढविणे, महिला आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण संवर्धन व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास यासह विविध विकास कामे केली जाणार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक, सांस्कृतिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरी स्थानिक संस्थांमध्ये सर्वांगीण व शाश्वत नागरी विकास साधण्याचा शासनाचा मानस आहे. या अभियानांतर्गत येवला नगरपालिकेला १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे येवला शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
सदर नागरी लोककल्याण अभियानाच्या माध्यमातून नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची, विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वाढविणे, महिला आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण संवर्धन व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास, तसेच नगरपालिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रोत्साहन देणे या महत्त्वाच्या उद्दिष्टांवर भर देण्यात येणार आहे.
यासोबतच, या अभियानांतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या नागरी सुविधांची विभागस्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, त्यातून नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कामांना प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे नागरी सुविधा अधिक सक्षम, आधुनिक व नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.
प्रतिक्रिया
येवला नगरपालिकेला मिळालेल्या या १ कोटी रुपयांच्या निधीचा उपयोग शहरातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व पर्यावरणपूरक विकासकामांसाठी करण्यात येणार असून, याचा थेट लाभ येवला शहरातील नागरिकांना मिळणार आहे.
माजी खासदार समीर भुजबळ