नाशिक, (प्रतिनिधी) २४ जानेवारी - पत्नीस फोन का करतो, या किरकोळ कारणावरून एकाच्या डोक्यात लोखंडी सळईने हल्ला करून त्यास जीवे ठार मारल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायलयाने महिलेसह चौघांना दोषी ठरवले. आरोपीना कोटार्ने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून हा प्रकार २०२३ मध्ये सिडकोतील त्रिमुर्तीचौकात घडला होता.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निलेश दिनकर निलेश ढोके (३३), पल्लवी निलेश ढोके (२६, रा.दोघे विठ्ठलनगर, कामटवाडे), प्रसाद शिरीष मुळे (३१, मंगलशक्ती अपा. इंदिरानगर) आणि सतिश आप्पा आहिरे (३६, रा. अष्टविनायक चौक, सावतानगर सिडको) असे दोषी आरोपींची नावे आहेत. ८ एप्रिल २०२३ रोजी या चौघांनी मिळून नितीन जाधव यास त्रिमुर्ती चौकातील गॅलक्सी हॉस्पिटल येथे गाठले. तु पल्लवीला फोन करतो, असा सवाल करीत त्यास लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्यात वर्मी घाव बसल्याने जखमी नितीन जाधव यास आडगाव येथील मेडीकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतांना २३ एप्रिल रोजी डॉ.मोहिल शहा यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिसांनी चौघा आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक सुनील बिडगर आणि हवालदार रवींद्रकुमार पानसरे यांनी करून पुरावे संकलीत केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांच्या कोर्टासमोर झाली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेटकर यांनी सरकारी पक्षातर्फे प्रभावी बाजु मांडली. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांनुसार कोटार्ने चौघा आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, हवालदार आर. बी. आजगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जयवंत गुळवे, हवालदार रंजना गायकवाड आदींनी या खटल्याचा पाठपुरावा केला.
मुलावर अत्याचार एकास जन्मठेप
नाशिक : अकरा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना औद्योगीक वसाहतीतील केवलपार्क भागात घडली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरज रामलेखा लोधी (रा. हिंदूस्थान बेकरी मागे आझादनगर, केवलपार्क अंबड लिंकरोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. परिसरातील अकरा वर्षीय मुलगा ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी आपल्या घर परिसरात खेळत असतांना ही घटना घडली होती. आरोपीने पैश्यांचे आमिष दाखवून त्यास आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले होते. घरात आलेल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. मुलाने घरी जावून आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक कृत्यासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालिन उपनिरीक्षक सुनिल बिडकर यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला कोर्ट क्र.सहाचे जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती पी.व्ही.घुले यांच्यासमोर चालला. सरकार तर्फे अॅड लिना चव्हाण यांनी बाजू मांडली. न्यायालयाने फिर्यादी साक्षीदार पंच व तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस दोन्ही कलमान्वये दोषी ठरवत जन्मठेप आणि ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील २५ हजार रूपये पिडीत मुलास नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत असाही निकाल पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.