पारंपरिक वेशभूषेतील महिलांचे नृत्य... भव्य पालखी मिरवणूक... 'काष्टी' साडीचा उत्साह... येवल्यातील या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 24-Jan-2026

येवला: येथील मधली गल्ली भागातील देवांग कोष्टी समाजाची आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी माता मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापनेचा १३ वा वर्धापनदिन आणि वसंत पंचमी महोत्सव शुक्रवारी (दि. २३) अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापूजा, भव्य पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

धार्मिक विधी आणि महापूजन
उत्सवाच्या दिवशी सकाळी ८ वाजता माताजींचा पंचामृत अभिषेक व महापूजन सोहळा पार पडला. पूजेचा मान सौ. व श्री. दीपक प्रभाकर विधाते, सौ. व श्री. विष्णू भगीरथ विधाते आणि सौ. व श्री. विकास सुधाकर वरोडे या दांपत्यांना मिळाला. वरोडे बंधूंच्या संगीतमय साथीने समाज बांधवांनी भक्तीभावाने महाआरती केली.

भव्य पालखी मिरवणूक व 'काष्टी' साडीचा उत्साह
ढोल-ताशांच्या गजरात शहराच्या प्रमुख मार्गावरून माताजींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी अन्य समाजाच्या वतीने पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक 'काष्टी' साडी परिधान करून व फेटे बांधून केलेले नृत्य सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. टक्कर गणेश मित्र मंडळाच्या वतीने टक्कर गणेश चौक व पहाड गल्ली येथे चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मान्यवरांची उपस्थिती व सत्कार
दुपारी समाज मंदिरात झालेल्या कार्यक्रमास कोष्टी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरुडे, येवला कोष्टी समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत, नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पाताई गायकवाड, नगरसेविका पद्माताई शिंदे, नगरसेवक रूपेश दराडे, संकेत शिंदे, अक्षय राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांसह ज्येष्ठ सेवेकरी शांताबाई भागवत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

विविध उपक्रम
उत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी गणेश जयंतीनिमित्त महाआरती आणि मकर संक्रांतीच्या औचित्याने महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी वसंत पंचमी उत्सव समिती, देवांग कोष्टी समाज विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ व महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण येवला शहरातून समाज बांधव व भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

 

Advertisement

Comments

No comments yet.