नाशिकचे जिल्हाधिकारी थेट शेतकरी आणि दिव्यांगांच्या घरी येतात... दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर दिले हे गिफ्ट...

Share:
Main Image
Last updated: 07-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ७ नोव्हेंबर - दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा पेटवत प्रशासनाने संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि दिव्यांग बांधव व शेतकऱ्यांची दिवाळी आनंददायी व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः थेट लाभार्थ्यांच्या दारी जाऊन त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या या 'मायेच्या भेटी'मुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना प्रशासनाचा मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळाला आहे.

स्वस्त धान्य दुकानांची पाहणी व सूचना:

आज सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३३ (म्हसरूळ, नाशिक) येथे अचानक भेट देऊन तेथील धान्य वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ आकडेवारी न घेता, प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत धान्य वेळेत पोहोचले आहे का आणि लाभार्थ्यांना व्हॉट्सॲप अथवा संदेशाद्वारे पूर्वकल्पना दिली जात आहे का, याची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. आज सायंकाळपर्यंत धान्य वितरण पूर्ण करून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची कडक दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित पुरवठा अधिकाऱ्यांना दिले.

पालखेड येथे दिव्यांग भगिनीच्या घरी पोहोचला दिवाळीचा आनंद:

दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कविता बाबुराव सोळसे या दिव्यांग महिला लाभार्थीच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. थेट जिल्हाधिकारी आपल्या दारात आल्याचे पाहून सोळसे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना अन्नधान्याचे घरपोच वितरण करण्यात आले.

यावेळी त्यांनी दिव्यांग निवृत्तीवेतन वेळेवर बँक खात्यात जमा होते का, इतर शासकीय योजनांचा लाभ मिळतो का, याबाबत सविस्तर चौकशी केली. "दिव्यांग बांधवांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर शासनाच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचाव्यात," असा संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी मांडला. पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व आवश्यक लाभ पोहोचवण्यासाठी आज रात्रीपर्यंत मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी नाशिकचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार पंकज पवार व पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी थेट संवाद; पाण्याचा तुटवडा लक्षात घेून काटकसरीचे आवाहन:

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत जिल्हाधिकाऱ्यांनी कोकणगाव (ता. निफाड) येथील विक्रम वामनराव मोरे आणि हेमंत मोरे यांच्या घरी भेट दिली. शासनाकडून जाहीर झालेली ५ हजार रुपयांची मदत खात्यावर जमा झाली आहे का, याची खात्री करत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

गावात भीषण पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून व नियोजनपूर्वक वापरण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले. यावेळी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रथमच थेट गावात आल्यामुळे शेतकऱ्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले.

शासकीय योजनांची पारदर्शक अंमलबजावणी, घरपोच धान्य, दिव्यांगांच्या समस्यांची दखल आणि बळीराजाशी साधलेला संवाद, यातून नाशिक जिल्हा प्रशासनाचा अत्यंत संवेदनशील व लोकाभिमुख चेहरा समोर आला आहे. दिवाळीच्या मंगल पर्वात प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

 

Comments

No comments yet.