खासगी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची लाचखोरी... तब्बल ७ लाख घेताना जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 06-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ६ नोव्हेंबर - पोल्ट्री फार्मवरील वीज चोरीचा दंड कमी करून देण्याच्या मोबदल्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नावाने तब्बल ७ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. शिवाजी खंडेराव शिंदे (वय ४८, रा. वाहेगांव, ता. चांदवड, जि. नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. नाशिकरोड येथील बिटको पॉईंटजवळील विद्युत भवनाबाहेर एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

नेमके प्रकरण काय?

५९ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक यांच्या शेतात 'पीपी बॉयलर' या नावाने आधुनिक पर्यावरण नियंत्रण प्रणालीचे (Environment Control System) पोल्ट्री फार्म आहे. दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी नाशिक येथील विद्युत भवनच्या भरारी पथकाने या पोल्ट्री फार्मला भेट देऊन वीज जोडणीची तपासणी केली.

तपासणीदरम्यान पथकातील अधिकाऱ्यांनी, "तुमच्या इलेक्ट्रिक मीटरमध्ये दोन केबल दिसत असून, तुम्ही मीटरव्यतिरिक्त अतिरिक्त विजेचा बेकायदेशीर वापर करत आहात," असा आक्षेप घेतला. हा वाद मिटवण्यासाठी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी ५ लाख रुपये अधिकृत दंड आणि ३ लाख रुपये रोख, अशी एकूण ८ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. तसेच, "तुम्हाला एका मोबाईल क्रमांकावरून फोन येईल, त्या व्यक्तीकडे पैसे द्या," असे सांगून प्रकरण मिटवण्याचे आमिष दाखवण्यात आले.

तडजोडीअंती ७ लाखांची मागणी व पडताळणी:

त्यानंतर एका खासगी इसमाने तक्रारदाराला संपर्क साधून लाचेच्या रकमेसाठी तगादा लावला. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली.

एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी सायंकाळी पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान खासगी इसम शिवाजी शिंदे याने तक्रारदारास नाशिकरोड येथील विद्युत भवनाबाहेर बोलावून, "भरारी पथकातील तिवारी जो दंड करणार आहेत तो कमी करून देतो," असे सांगून तडजोडीअंती ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी पंचांसमक्ष निश्चित केली.

विद्युत भवनाबाहेर सापळा रचून कारवाई:

लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने नाशिकरोड येथील विद्युत भवनाबाहेर अत्यंत गोपनियतेने सापळा रचला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ७ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने खासगी इसम शिवाजी शिंदे याला रंगेहात ताब्यात घेतले.

याप्रकरणी नाशिक शहर येथील उपनगर पोलीस ठाण्यात 'भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ (अ)' अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पथक:

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

 * सापळा अधिकारी: पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे

 * पर्यवेक्षक अधिकारी: वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत

 * सापळा पथक: पोलीस हवालदार संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, प्रभाकर गवळी आणि किरण धुळे.

नागरिकांना एसीबीचे आवाहन:

कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने कोणतीही खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी न घाबरता तात्काळ एसीबीच्या '१०६४' या टोल फ्री क्रमांकावर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.