नाशिक, (प्रतिनिधी) ६ नोव्हेंबर - नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो रेल्वे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट दर धोरणाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. दररोज मुंबई व इतर शहरांकडे प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या आवडीच्या ‘पंचवटी एक्सप्रेस’, ‘राज्यराणी एक्सप्रेस’ आणि ‘सेवाग्राम एक्सप्रेस’ या गाड्यांवर रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त ‘सुपरफास्ट’ शुल्क आकारले जात आहे. वेळेची कोणतीही बचत होत नसताना केवळ नावापुरत्या 'सुपरफास्ट' दर्जाच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला मोठा भुर्दंड लावला जात आहे. त्यामुळे या गाड्यांचा सुपरफास्ट टॅग हटवून त्यांना नियमित मेल/एक्सप्रेसचा दर्जा द्यावा, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
वेळेची बचत नाही, मग अतिरिक्त सरचार्ज कशासाठी?
नियमित प्रवाशांच्या मते, सुपरफास्ट दर्जा असलेल्या गाड्यांसाठी सामान्य तिकीट दरापेक्षा प्रति तिकीट १५ रुपये extra मोजावे लागतात, तर एसी श्रेणीसाठी हा भुर्दंड अधिक असतो. मात्र, प्रत्यक्षात या गाड्यांचा वेग पाहता सुपरफास्टचे निकष पूर्ण होत नाहीत. उदा. सेवाग्राम एक्सप्रेसला नाशिक रोड ते भुसावळ प्रवासासाठी ३ तास ४५ मिनिटे लागतात; तर दुसरीकडे विना-सुपरफास्ट असलेली 'गोदावरी एक्सप्रेस' हाच प्रवास ३ तास १० मिनिटांत पूर्ण करते. वेळेची बचत न होताही आकारल्या जाणाऱ्या या शुल्कामुळे मासिक पासधारक व रोजच्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, राज्यराणी एक्सप्रेस मुंबई-नांदेड दरम्यान सामान्य तर बनारस-मनमाड दरम्यान सुपरफास्ट धावत असल्याने दरांमध्ये विसंगती निर्माण झाली आहे.
१ जानेवारी २०२७ पासून ६ गाड्यांचा 'सुपरफास्ट' दर्जा रद्द; नवे क्रमांक जाहीर
प्रवाशांच्या या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे बोर्डाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार मध्य रेल्वेने १ जानेवारी २०२७ पासून ६ जोडड्यांच्या (एकूण १२) लांब पल्ल्याच्या गाड्यांचा 'सुपरफास्ट' दर्जा काढून त्यांना नॉन-सुपरफास्ट श्रेणीत चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता अतिरिक्त 'सुपरफास्ट सरचार्ज' भरावा लागणार नाही. दर्जा बदलीसंदर्भात या गाड्यांचे रेल्वे क्रमांकही बदलण्यात आले आहेत:
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) - हिंगोली जन शताब्दी एक्सप्रेस:
जुना क्रमांक: १२०७१ / १२०७२ ➔ नवा क्रमांक: ११०६९ / ११०७०
२. CSMT - बनारस महानगरी एक्सप्रेस:
जुना क्रमांक: २२१७७ / २२१७८ ➔ नवा क्रमांक: ११०९३ / १११०९४
३. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - अयोध्या कॅंट तुलसी एक्सप्रेस:
जुना क्रमांक: २२१२९ / २२१३० ➔ नवा क्रमांक: ११०६५ / ११०६६
४. LTT - बनारस एक्सप्रेस:
जुना क्रमांक: १२१६७ / १२१६८ ➔ नवा क्रमांक: ११०६७ / ११०६८
५. पुणे - काझीपेट एक्सप्रेस:
जुना क्रमांक: २२१५१ / २२१५२ ➔ नवा क्रमांक: ११४३७ / ११४३८
६. गोवा एक्सप्रेस (वास्को दा गामा - हजरत निजामुद्दीन):
जुना क्रमांक: १२७७९ / १२७८० ➔ नवा क्रमांक: १७३७९ / १७३८०
नाशिककरांची मागणी अपूर्णच; आंदोलनाचा इशारा
रेल्वेने ६ लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असले, तरी नाशिककरांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या पंचवटी (गाडी क्र. १२११०), राज्यराणी आणि सेवाग्राम एक्सप्रेसबाबत अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे स्थानिक प्रवाशांमधील नाराजी कायम आहे. रेल्वे प्रशासनाने या तिन्ही गाड्यांचाही सुपरफास्ट दर्जा तातडीने रद्द करून तिकीट दरात दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे.
प्रवाशांसाठी रेल्वेचे आवाहन:
१ जानेवारी २०२७ नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बुकिंग करताना नव्या ट्रेन क्रमांकांची नोंद घ्यावी. ऐनवेळी संभ्रम टाळण्यासाठी नॅशनल ट्रेन इंक्वायरी सिस्टम (NTES) किंवा अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.