नाशिकमध्ये हॉटेल कर्मचाऱ्यांची गुंडगिरी... पर्यटकांना बेदम मारहाण... कारही फोडली...

Share:
Main Image
Last updated: 06-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ६ नोव्हेंबर - शहरातील मालेगाव स्टँड परिसरातील एका हॉटेलमध्ये ऑनलाईन बुकिंगच्या वादातून पर्यटकांवर भयंकर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रूमची चावी मागितल्याच्या कारणावरून हॉटेल कर्मचाऱ्यांनी दोन मित्रांना लाकडी दांडक्यांनी व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी पर्यटकांची अलिशान कारही फोडून मोठे नुकसान केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्परता दाखवत चारही संशयितांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

नेमका काय घडला प्रकार?

मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी आदित्य चंद्रबली उपाध्याय व त्यांचे मित्र अहमद मोहम्मद अलमामारी हे दोघे बुधवारी (दि. ४) काही वैयक्तिक व व्यावसायिक कामानिमित्त नाशिक शहरात आले होते. रात्री शहरात पोहोचण्यास उशीर होणार असल्याने, अलमामारी यांनी पूर्वतयारी म्हणून मालेगाव स्टँड परिसरातील ‘पंजाब बार’ (हॉटेल) येथे ऑनलाईन प्रणालीद्वारे रूम बुक केली होती.

मध्यरात्रीच्या सुमारास दोघे मित्र हॉटेल परिसरात पोहोचले आणि आपली कार पार्किंगमध्ये उभी करून काउंटरवर गेले. त्यांनी ऑनलाईन बुकिंगचे तपशील दाखवून रूमची चावी मागितली. मात्र, काउंटरवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे रूमसाठी अतिरिक्त पैशांची (Extra Money) बेकायदेशीर मागणी केली.

अतिरिक्त पैशांवरून वाद; कर्मचाऱ्यांची हिंसक गुंडगिरी

पर्यटकांनी आधीच ऑनलाईन पैसे भरले असल्याचे सांगून जादा पैसे देण्यास नकार दिला आणि कर्मचाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी संतप्त झालेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी पर्यटकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. बोलता बोलता वाद विकोपाला गेला आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने दोन्ही मित्रांना अवाच्य शिवीगाळ करत अचानक हल्ला चढवला.

संशयितांनी लाथाबुक्क्यांनी आणि जवळच असलेल्या लाकडी दांडक्यांनी दोन्ही मित्रांना अत्यंत निर्दयपणे बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटक मित्र गंभीर जखमी झाले. एवढा धुमाकूळ घातल्यानंतरही संशयितांचे समाधान झाले नाही; त्यांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या तक्रारदारांच्या ‘KL 40 V 8999’ या बलेनो कारच्या पुढील आणि मागील काचा लाकडी दांडक्यांनी फोडून टाकल्या व कारचे मोठे नुकसान केले.

पोलीस ठाण्यात धाव; चौघांना बेड्या

हल्ल्यातून कसेबसे स्वतःला वाचवत जखमी मित्रांनी थेट पंचवटी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला भयानक प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रारदार आदित्य उपाध्याय यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाऱ्या चारही संशयितांच्या आवळल्या मुसक्या.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे:

१. अविनाश बाळू बागुल (रा. मुरंबी, ता. इगतपुरी, नाशिक)

२. राम भरोज राजपूत (रा. बिहार)

३. देवेंद्र सोहित मुखिया (रा. बिहार)

४. रोशन कुमार पासवान (रा. बिहार)

पर्यटनाला गालबोट; तपास सुरू

नाशिक हे धार्मिक व पर्यटनाचे प्रमुख केंद्र असल्याने दररोज हजारो नागरिक शहरात येतात. मात्र, अशा प्रकारे हॉटेल कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गुंडगिरीमुळे नाशिकच्या पर्यटनाला मोठा गालबोट लागत असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.

 

Comments

No comments yet.