सिंहस्थ कुंभमेळ्याचे अधिकृत संकेतस्थळ भाविकांसाठी खुले... नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या तयारीची माहिती आता एका क्लिकवर...

Share:
Main Image
Last updated: 05-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ५ नोव्हेंबर - नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आयोजित होणाऱ्या 'सिंहस्थ कुंभपर्व २०२७' च्या तयारीला ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याने औपचारिक प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जगभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना कुंभमेळ्याशी संबंधित सर्व अधिकृत व विश्वासार्ह माहिती एकाच ठिकाणी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळ (Website) सुरू केले आहे.

अधिकृत संकेतस्थळ: https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in

 

हे पोर्टल देश-विदेशातील भाविकांसह विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन, वाहतूक क्षेत्र आणि प्रसारमाध्यमांसाठी डिजिटल महितीचे मुख्य केंद्र ठरणार आहे.

एकाच व्यासपीठावर मिळणारे महत्त्वाचे अपडेट्स

कुंभमेळ्यादरम्यान पसरणाऱ्या अफवा रोखणे आणि भाविकांना प्राधिकृत माहिती पुरवणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे. या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने खालील माहिती व सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत:

 * पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा: प्रमुख पर्वण्या, शाही स्नान, धार्मिक विधी आणि आखाड्यांच्या मिरवणुकांचे अधिकृत वेळापत्रक.

 * धार्मिक व सांस्कृतिक वारसा: नाशिक व त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व, इतिहास, प्रमुख मंदिरे, गोदावरी नदीचे घाट आणि विविध साधू-संतांच्या आखाड्यांची विस्तृत माहिती.

 * प्रवास व वाहतूक नियोजन: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे सर्व उपलब्ध पर्याय, बस मार्ग आणि स्थानिक वाहतूक व्यवस्था.

पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन सुरक्षेची माहिती

कुंभमेळा काळात लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्याने त्यांना नागरी सुविधा शोधणे सोपे जावे, यासाठी हे संकेतस्थळ मोलाचे ठरणार आहे:

१. मूलभूत सुविधा: पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था (हॉटेल्स, धर्मशाळा, तंबू), वाहनतळ (Parking Plots) आणि मदत कक्षांचे लोकेशन.

२. वैद्यकीय मदत: आपत्कालीन वैद्यकीय मदत केंद्रे, तात्पुरती रुग्णालये, ॲम्बुलन्स सुविधा आणि वैद्यकीय पथकांची माहिती.

३. सुरक्षा आणि आपत्कालीन संपर्क: सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित सूचना, नियंत्रण कक्षांचे (Control Room) आपत्कालीन फोन नंबर आणि पोलीस मदत कक्ष.

अधिकृत माहितीचा व्यापक प्रसार करण्याचे प्राधिकरणाचे आवाहन

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी ही अत्यंत व्यापक आणि बहुविभागीय प्रक्रिया आहे. त्यामुळे या अधिकृत पोर्टलची माहिती आणि लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस विभाग, लोकप्रतिनिधी, पर्यटन व्यवसायिक आणि मीडिया पार्टनर यांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

प्रसारमाध्यमांनी तसेच विविध संस्थांनी कुंभमेळ्याशी संबंधित वृत्त प्रसिद्ध करताना याच अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ द्यावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही आणि नागरिकांपर्यंत अत्यंत अचूक माहिती पोहोचेल. सिंहस्थ कुंभपर्वाचे यशस्वी आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

Comments

No comments yet.