नाशकात दिवाळीनंतर सुरू होणार... महापालिकेची जय्यत तयारी...

Share:
Main Image
Last updated: 05-Nov-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ नोव्हेंबर - कुंभमेळा तयारीला आता वेग आला असून, महापालिका प्रशासनाने पायाभूत सुविधांच्या कामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कुंभमेळ्यादरम्यान होणारी गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर चोवीस तास बारीक नजर ठेवण्यासाठी नाशिक शहरात उभारण्यात येत असलेल्या अद्यायावत सुरक्षा यंत्रणेचा पहिला टप्पा लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. दिवाळीनंतर शहरात बसवण्यात आलेल्या ५,५00 पैकी तब्बल १,५00 सीसीटीव्ही कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर (Trial Basis) सुरू करण्यात येणार आहेत.

सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी एकात्मिक जाळे

नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाकडून कुंभमेळ्याच्या निमित्ताने संपूर्ण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्रात मिळून तब्बल ५,५00 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकट्या नाशिक शहरात ४,५00 कॅमेरे असणार आहेत, तर त्र्यंबकेश्वर क्षेत्रात १,,००० कॅमेरे बसवले जात आहेत.

या भव्य प्रकल्पामागचा मुख्य उद्देश भाविकांच्या सुरक्षेसोबतच गर्दीचे अचूक व्यवस्थापन करणे हा आहे. कुंभमेळा काळात लाखो-कोटी भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. अशा वेळी गर्दीचा लोट कुठे उसळतोय, वाहतूक कशी सुरू आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित मदत कशी पोहोचवता येईल, यासाठी हे सीसीटीव्ही जाळे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील या सर्व हालचालींवर पंचवटी येथील स्मार्ट सिटी कार्यालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरवरून थेट एकाच ठिकाणहून लक्ष ठेवले जाणार आहे.

दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यातील चाचणी

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने आता महापालिकेकडून बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या चाचणीचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात शहरात आधीच स्थापित करण्यात आलेल्या सुमारे १,५00 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चाचणी घेतली जाईल. कमांड अँड कंट्रोल सेंटरवरून हे कॅमेरे सुरळीत काम करत आहेत की नाही, याची खात्री केली जाईल.

या प्रायोगिक चाचणीचा मुख्य फायदा म्हणजे, प्रत्यक्ष कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच गर्दी नियंत्रणासाठीच्या प्रमाणित कार्यपद्धतींची (SOPs) चाचपणी करता येणार आहे. लाखो भाविकांच्या आगमनापूर्वी तांत्रिक त्रुटी शोधून त्या दूर करणे आणि सुरक्षा यंत्रणेला अधिक धारदार बनवणे याद्वारे शक्य होणार आहे.

ऑप्टिकल फायबर केबलचे मोठे जाळे

ही संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत वेगवान आणि सुरळीत चालावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे पसरवले जात आहे. या प्रकल्पांतर्गत जवळपास ३५५ किलोमीटर लांबीचे फायबर नेटवर्क पूर्ण झाले असून, उरलेल्या भागातील काम नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील चालू असलेल्या इतर रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबत समन्वयाने वेगाने पूर्ण केले जात आहे.

कुंभमेळ्यातील शाही मार्गांच्या मिरवणूक मार्ग, साधूग्राम, रामकुंड आणि गोदावरी काठावरील परिसर, शहरात प्रवेश करण्याचे प्रमुख मार्ग, वाहनांसाठी ठरवलेले पार्किंग झोन आणि वर्दळीचे मुख्य चौक यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि मोक्याच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवले जात आहेत.

कुंभमेळ्यानंतरही शहरासाठी वरदान

प्रशासनाने सर्व कुंभमेळा-संबंधित कामांसाठी एक निश्चित कालमयादा (Timeline) ठरवली असून, ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी सतत आढावा घेतला जात आहे. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी ही डिजिटल सुरक्षा यंत्रणा केवळ काही महिन्यांच्या उत्सवापुरती मर्यादित नसून, कुंभमेळा संपल्यानंतरही नाशिक शहराच्या दैनंदिन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक नियमनासाठी कायमस्वरूपी उपयुक्त ठरणार आहे. या आधुनिक सुरक्षा कवचांमुळे नाशिक शहराच्या सुरक्षा यंत्रणेत ऐतिहासिक सुधारणा होईल, यात शंका नाही.

Comments

No comments yet.