नाशिक, (प्रतिनिधी) ४ नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्याचा दौरा करून शेतकरी, स्थानिक नागरिक, पीडित कुटुंबे आणि भाविकांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण, प्रशासकीय दुर्लक्ष आणि मनपाच्या कामांमधील कथित भ्रष्टाचारावरून राज्य सरकार व स्थानिक प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
द्राक्ष व कांदा उत्पादकांच्या व्यथा आणि 'विशेष आर्थिक पॅकेज'ची मागणी
लासलगाव येथे भेट दिली असता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोहित पवार यांचे कांद्याची टोपली भेट देऊन स्वागत केले. पूर्वी कांद्याचे भाव कोसळले असताना केलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने योग्य भाव मिळाला, याबद्दल शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार पवारांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. २०२४ मधील गारपीट, २०२५ मधील अतिवृष्टी, यंदाचा दुष्काळ आणि वाढलेली उष्णता या नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकरी कर्जाच्या खाईत ढकलला गेला आहे. या पार्श्वभूमीवर:
द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारने तातडीने 'विशेष आर्थिक पॅकेज' जाहीर करावे.
नुकसानीचे त्वरित पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी.
शेतीसाठी सरसकट कर्जमाफी आणि उत्पादनावर आधारित हमीभाव देण्याचे ठोस धोरण राबवावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि अपघातग्रस्त कुटुंबाचे सांत्वन
खडक माळेगाव (निफाड): नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेले द्राक्ष उत्पादक शेतकरी व सोसायटीचे माजी चेअरमन कै. संतू कचरू रायते यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. "एका प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या हे आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कामटवाडे (नाशिक): रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झालेले तरुण व्यावसायिक कै. निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. हा अपघात नसून प्रशासकीय दुर्लक्ष व भ्रष्टाचाराने घेतलेला बळी आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
पळसे (दिवाळी फराळ वाटप): दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पळसे येथील शेतकरी अशोक नामदेव सहाणे यांच्या घरी भेट देऊन त्यांना दिवाळी फराळ व लहान मुलांना कपड्यांचे वाटप केले.
गोदावरी नदीतील सांडपाणी अन् कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या बजेटवर प्रश्नचिन्ह
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी नाशिकमधील गोदावरी नदीची आणि सांडपाणी सोडल्या जाणाऱ्या नाल्याची थेट पाहणी केली. रामकुंडापासून हाकेच्या अंतरावर गटारीचे दूषित पाणी थेट गोदावरीत मिसळत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, "सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचे बजेट असताना गोदावरीत मिसळणारे दूषित पाणी रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. केवळ घाटांचे सुशोभीकरण व रोषणाई म्हणजे कुंभमेळ्याची तयारी नव्हे! प्रशासनाने तातडीने हे दूषित पाणी रोखावे."
तसेच, मायको सर्कल परिसरातील सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावर पडलेले खड्डे राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर डांबराने बुजवण्याच्या मनपाच्या तात्पुरत्या 'पॅचवर्क' कारभारावरही त्यांनी टीका केली.
काळाराम मंदिर आणि श्री सिंहस्थ गंगा गोदावरी मंदिरात दर्शन
आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे प्रतीक असलेल्या श्री काळाराम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामातेचे दर्शन घेतले. तसेच, दर १२ वर्षांनी केवळ कुंभमेळ्याच्या पवित्र काळातच उघडणाऱ्या 'श्री सिंहस्थ गंगा गोदावरी मंदिरा'ला भेट देऊन गोदामातेच्या चरणी प्रार्थना केली.
राज्यातील दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि बळीराजाला न्याय देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. या संपूर्ण दौऱ्यात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.