नाशिक, (प्रतिनिधी) ४ नोव्हेंबर - सातपूर परिसरातील दादासाहेब गायकवाड नगर भागात एका तरुणीच्या छेडछाडीचा जाब विचारल्याच्या कारणातून संतापलेल्या एका टोळक्याने २१ वर्षीय युवकाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात हल्लेखोरांनी हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा सातपूर राजवाडा परिसरात राहणारा असून त्याचे वय २१ वर्ष आहे. काही दिवसांपूर्वी संशयित आरोपींनी त्याच्या बहिणीची छेड काढली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणाराने सोमवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास दादासाहेब गायकवाड नगर भागात संबंधित संशयितांना गाठले. बहिणीच्या छेडछाडीबाबत जाब विचारत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न तरुण करत होता.
मात्र, याचा राग आल्याने संशयित टोळक्याने हुज्जत घालायला सुरुवात केली. वाद वाढल्यामुळे संतप्त झालेल्या संशयितांनी मिळून त्या तरुणाला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांपैकी एकाने हातातील लोखंडी कड्याने तरुणाच्या डोक्यात व शरीरावर वार केले. या भीषण हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी जखमी तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खालील चार संशयितांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे:
१. अर्जुन नागरे (रा. सातपूर गाव)
२. प्रशांत नागरे (रा. सातपूर गाव)
३. लकी शिंदे (रा. सातपूर गाव)
४. अलकमा (रा. सातपूर गाव)
पोलीस तपास सुरू
दिवसेंदिवस शहरात छेडछाडीच्या घटना आणि त्यानंतर होणाऱ्या हाणामारीच्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याचे हवालदार भुसारे हे पुढील तपास करत असून, घटनेनंतर पसार झालेल्या संशयितांचा शोध घेतला जात आहे. गुन्ह्याची गंभीरता पाहता पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.