नाशिक, (प्रतिनिधी) ३ नोव्हेंबर - भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाच्या ३१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकताच नाशिक जिल्ह्याचा तीन दिवसांचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण दौरा आयोजित करण्यात आला होता. नाशिकची समृद्ध शेती, प्रगत उत्पादन उद्योग, औषध निर्माण क्षेत्र आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेची सखोल पाहणी करून राष्ट्रीय स्तरावरील धोरणनिर्मितीसाठी माहिती गोळा करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने या संपूर्ण दौऱ्याचे उत्कृष्ट समन्वय साधले, तर 'सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमिटेड'ने यजमान म्हणून व्यवस्था पाहिली. या शिष्टमंडळात आर्थिक सल्लागार, संचालक, उपसंचालक आणि युवा तज्ज्ञांचा समावेश होता.
पहिला दिवस: आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि ग्रामीण अर्थकारण
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांनी सह्याद्री फार्म्सच्या शेतकरीकेंद्री कार्यपद्धतीचा सविस्तर अभ्यास केला. द्राक्ष, केळी आणि डाळिंब यांसारख्या फळांची निर्यात साखळी, आधुनिक पॅकहाऊस आणि प्रक्रिया केंद्रांची त्यांनी पाहणी केली. शेतीतील ड्रोन तंत्रज्ञान, हवामान-सहिष्णू वाण, कृषी-सौर ऊर्जा आणि रोबोटिक्स उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर सावरगाव येथील शेतकरी गटाशी संवाद साधून ग्रामीण भागातील अर्थकारण समजून घेतले व सगीर गावातील कुक्कुटपालन व्यवसायाची पाहणी केली.
दुसरा दिवस: बायोटेक, ऑटोमोबाईल आणि वाइन टुरिझम
दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळाने अक्राळे-दिंडोरी येथील 'रिलायन्स लाइफ सायन्सेस'ला भेट देऊन जैव-औषध निर्माण आणि प्लाझ्मा उत्पादनांची माहिती घेतली. यानंतर सातपूर औद्योगिक वसाहतीतील 'टीडीके इलेक्ट्रॉनिक्स' आणि 'महिंद्र अँड महिंद्र' या बड्या कंपन्यांना भेटी देऊन ऑटोमेशन व भविष्यातील ऑटोमोबाईल तंत्रज्ञानावर चर्चा केली. दिवसाच्या शेवटी 'सुला व्हाइनयार्ड्स'ला भेट देऊन वाइन निर्मिती, द्राक्ष शेतीची मूल्य साखळी आणि वाइन टुरिझमचा आढावा घेतला.
तिसरा दिवस: पैठणी उद्योग, वीज उपकरणे आणि कुंभमेळा आढावा
दौऱ्याच्या अंतिम दिवशी अधिकाऱ्यांनी येवला येथील प्रसिद्ध 'कापसे पैठणी केंद्रा'ला भेट देऊन पारंपरिक पैठणी निर्मिती, विणकरांचे कौशल्य आणि महिला रोजगाराबाबत चर्चा केली. यानंतर नाशिक शहरातील कुंभमेळा आयुक्त कार्यालयात जाऊन आगामी 'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' च्या नियोजनाची माहिती घेतली. शेवटी 'एबीबी' कंपनीला भेट देऊन वीज उपकरण निर्मिती आणि ग्रिड आधुनिकीकरणावर विचारविनिमय केला.
नाशिकच्या विकासाला केंद्र सरकारचे धोरणात्मक पाठबळ मिळणार
या त्रिदिवसीय अभ्यास दौऱ्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आर्थिक धोरणे आखणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणकर्त्यांना नाशिकच्या अर्थकारणाचे सर्वसमावेशक दर्शन घडले. शेती, उद्योग, अभियांत्रिकी आणि पारंपरिक कला यांचा मेळ घालणाऱ्या नाशिकच्या प्रादेशिक क्षमतेची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. या यशस्वी दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्याला देशाच्या आर्थिक नकाशावर अधिक मजबूत स्थान मिळाले असून भविष्यात केंद्राकडून मोठ्या धोरणात्मक व आर्थिक पाठबळाचा मार्ग मोकळा झाला आहे.