अंबडमध्ये कारखान्याने नैसर्गिक प्रवाहात सोडली विषारी रसायने... असे झाले उघड...

Share:
Main Image
Last updated: 01-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १ नोव्हेंबर - अंबड औद्योगिक वसाहतीतील (MIDC) एका कारखान्याकडून थेट नैसर्गिक प्रवाहात घातक आणि विषारी सांडपाणी सोडण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तातडीने पंचनामा करावा आणि पुरावा नष्ट होऊ नये यासाठी संबंधित जागा तातडीने सील करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गंगाधर दातीर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना अधिकृत पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विषारी रसायनांचा थेट प्रवाहात विसर्ग

साहेबराव दातीर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अंबड एमआयडीसीमधील प्लॉट नंबर F-128 येथील कारखान्यातून जाणीवपूर्वक आणि नियम डावलून घातक रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक प्रवाहात सोडले जात आहे. या प्रकाराचे पुरावे म्हणून काही छायाचित्रेही समोर आली आहेत. कारखान्याच्या भिंतीला लागून असलेल्या नैसर्गिक प्रवाहात ही रसायने मिसळत असून, भिंतीवर पडलेला गडद पिवळा रंग हा अत्यंत विषारी अशा 'हेक्साव्हॅलेंट क्रोमियम' (Hexavalent Chromium) ची उपस्थिती स्पष्टपणे दर्शवत आहे. हा प्रकार पर्यावरण संरक्षणाच्या नियमांना हरताळ फासणारा असून, यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी क्रूर खेळ खेळला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

कायद्याचे थेट उल्लंघन आणि NGT मधील प्रकरण

हा प्रकार 'वॉटर (प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन) ॲक्ट, १९७४ चे कलम ३३ए' आणि 'एर (प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन) ॲक्ट, १९८१ चे कलम ३१ए' या कायद्यांचे थेट उल्लंघन करणारा आहे. विशेष म्हणजे, याआधीच या भागातील भूजलामध्ये हेक्साव्हॅलेंट क्रोमियम सापडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या गंभीर मुद्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर (National Green Tribunal - NGT) OA क्र. १८९/२०२६ (WZ) हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पुरावा नष्ट होण्याची दाट शक्यता

सदर प्रकरणात एनजीटीमध्ये सुनावणी सुरू असल्याने संबंधित कारखानदार आणि गुन्हेगार स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी दाट भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता अत्यंत सतर्कता बाळगणे गरजेचे बनले आहे.

तातडीच्या कठोर कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत साहेबराव दातीर यांनी प्रशासनाकडे खालीलप्रमाणे आग्रही मागण्या केल्या आहेत:

पाणी व मातीचे नमुने: संबंधित जागेवरून पाणी आणि मातीचे नमुने (Samples) तातडीने जप्त करण्यात यावेत.

जागा सील करणे: पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करून संबंधित जागा तातडीने सील करावी.

दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही: पर्यावरण आणि नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या दोषींवर कायदेशीर व फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी.

प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कायदेशीर पावले उचलते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.

 

Comments

No comments yet.