नाशिकच्या वाहतुकीसाठी २६,८३९ कोटींचा प्लॅन... काय काय होणार त्यात?

Share:
Main Image
Last updated: 01-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १ नोव्हेंबर - आगामी तीन दशकांमध्ये नाशिक शहराच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी तब्बल २६,८३९ कोटी रुपयांचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (Comprehensive Mobility Plan - CMP) तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महा-मेट्रो) नाशिक महानगरपालिकेसाठी (NMC) हा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला असून, यात ५८.०८ किलोमीटर लांबीची मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (MRTS), १३०० हून अधिक नवीन बसेस, रिंगरोडचे बळकटीकरण, नवे रस्ते, पूल आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष वाहतूक धोरणाचा समावेश आहे. हा सुधारित आराखडा मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.

५८ किमीची मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक बळकटीकरण

वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि प्रवासाच्या पद्धतींचा सखोल अभ्यास करून महामेट्रोने हा आराखडा सन २०५६ पर्यंतच्या नाशिकच्या गरजेनुसार तयार केला आहे. या प्रकल्पातील प्रमुख ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (MRTS): शहरात सार्वजनिक वाहतूक जलद करण्यासाठी ५८.०८ किमी लांबीचे जाळे उभारण्याचे प्रस्तावित आहे.

बस सेवा विस्तार: शहराच्या परिवहन सेवेत आणखी १,३३९ नवीन बसेस समाविष्ट केल्या जातील. तसेच ७३५ बस स्टॉप्स नव्याने विकसित किंवा सुधारित केले जातील.

याशिवाय १२३ किमीचे वर्तुळाकार (Circular) बस मार्ग आणि ७५.३ किमीचे फिडर मार्ग सुरू करण्याची शिफारस करण्यात आली असून, बस सेवांना मेट्रो, रेल्वे आणि इतर वाहतूक साधनांशी जोडले जाईल.

पादचारी व सायकल चालकांसाठी विशेष कॉरिडॉर

शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे:

१२५ किमी लांबीची पादचारी (Pedestrian) पायाभूत सुविधा.

८८.३ किमी लांबीचे सायकल ट्रॅक.

नदीकाठच्या भागात १४ किमी नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर.

सुरक्षित रस्ते ओलांडण्यासाठी ग्रेड सेपरेटर आणि रहदारीच्या ठिकाणी आधुनिक सुधारणा.

रस्ते जाळे आणि मल्टीमोडल हब

शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंगरोडचे बळकटीकरण, नवीन रस्ते जोडणी, गोदावरी नदीवर नवे पूल आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. तसेच, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि इतर वाहतूक सेवा एकाच छताखाली आणण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर एक मोठे 'मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब' उभारण्याचे प्रस्तावात नमूद आहे. वाहनांच्या पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंग धोरण राबवले जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष रणनीती

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखाडो भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आराखड्यात विशेष 'कुंभ मोबिलिटी स्ट्रॅटेजी' समाविष्ट केली आहे:

पार्क-अँड-राईड सुविधा आणि शटल कॉरिडॉर.

पंचवटी-रामकुंड-संगम घाट परिसरात पादचाऱ्यांना प्राधान्य देणारे परिसर (Pedestrian-priority zones).

विकेंद्रित प्रवासी टर्मिनल, बहुभाषिक फलक आणि गर्दी व्यवस्थापन प्रणाली.

सध्या हा संशोधित आराखडा महापालिकेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, त्यानंतर तो नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी खुला केला जाईल आणि अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला जाईल. या दूरगामी आराखड्यामुळे आगामी काळात नाशिकचे चित्र पूर्णपणे बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Comments

No comments yet.