भरधाव कारने उडवले... ६० वर्षीय पादचारी ठार...

Share:
Main Image
Last updated: 31-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३१ ऑक्टोबर - नाशिक-पुणे मार्गावरील पळसे गावाजवळ एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने ६० वर्षीय पादचारी जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २९) रात्री हा अपघात घडला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुरुवारी रात्री घडली दुर्घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब आबाजी सहाणे (वय ६०, रा. पळसे गाव, ता. व जि. नाशिक) असे मृत पादचारीचे नाव आहे.

मृत भाऊसाहेब सहाणे हे गुरुवारी रात्रीच्या सुमारास पळसे येथील हिंदुस्तान पेट्रोल पंपासमोरून सर्व्हिस रोडने चालत आपल्या घराकडे जात होते. ते पळसेगाव कमानीजवळील 'बोल्हाई पान स्टॉल'जवळ आले असता, पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने (एमएच १५ जेडी ९१३९) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सहाणे रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.

बिटको रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. दरम्यान, ॲम्ब्युलन्स चालक पंढरीनाथ गिते यांनी प्रसंगावधान दाखवत गंभीर जखमी झालेल्या भाऊसाहेब सहाणे यांना तातडीने उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांकडून तपास सुरू

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत. भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Comments

No comments yet.