केशव खेडकर, (नाशिक) ३१ ऑक्टोबर - धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्वाची परंपरा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अभूतपूर्व मंगलमय वातावरण पाहायला मिळाले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ ध्वजपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय आणि वेदोक्त मंत्रोच्चारात पार पडला. याप्रसंगी राष्ट्रपतींनी गौतमी गंगा गोदावरीचे पूजन, विशेष अर्घ्य अर्पण करून भावपूर्ण गोदावरी आरती केली. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यानंतर राष्ट्रपतींनी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे विधिवत पूजन व भाविक दर्शन घेतले.
कुशावर्त तीर्थावर भक्तिमय सोहळा
आज ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर आगमन झाले. कुशावर्त तीर्थ हे गोदावरी नदीचे उगमस्थान मानले जात असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक आणि पौराणिक परंपरेत या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
राष्ट्रपतींचे आगमन होताच वैदिक पुरोहितांच्या मंत्रघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपतींच्या हस्ते पवित्र गौतमी गंगा गोदावरीचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रतीक असलेल्या सिंहस्थ ध्वजाचे पूजन करण्यात आले. राष्ट्रपतींनी गोदावरी नदीला विशेष अर्घ्य अर्पण करून महाआरती केली. वैदिक ऋचांचा गजर, साधू-महंतांची उपस्थिती आणि गोदावरीच्या पवित्र जलावर झालेली आरती यामुळे कुशावर्त तीर्थ परिसरात एक अलौकिक अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
राजकीय व प्रशासकीय मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या पवित्र सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याशिवाय पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, रोहयो व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल या केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार गोकुळ गीते, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर आणि त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार आदी उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीजी महाराज आणि विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरोहित संघाकडून ताम्रपट भेट
सिंहस्थ ध्वजपूजन व गोदा पूजन सोहळ्यानंतर पुरोहित संघाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राष्ट्रपतींना आदरांजली व कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून पुरोहित संघातर्फे सन्मानपूर्वक ‘ताम्रपट’ प्रदान करण्यात आला.
श्री त्र्यंबकराजाचे दर्शन व पूजा
कुशावर्त तीर्थावरील धार्मिक विधी संपल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. मंदिरात पुरोहित गिरीश जोशी यांच्या पौरोहित्याखाली राष्ट्रपतींच्या हस्ते भगवान त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. राष्ट्रपतींनी गाभाऱ्यात दर्शन घेऊन देशवासीयांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने राष्ट्रपती महोदयांचा सत्कार करण्यात आला आणि स्मृतीचिन्ह म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची सुबक व देखणी प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी
त्र्यंबकेश्वर ही केवळ एक धार्मिक नगरी नसून ती भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडलेल्या या सिंहस्थ ध्वजपूजनामुळे आणि गोदावरी आरतीमुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची अधिकृत आणि मंगलमय नांदी मानली जात आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.