यांना मिळणार ५ हजार रुपये दिवाळी बोनस... आंदोलन आणि पाठपुराव्याला शेवटी यश...

Share:
Main Image
Last updated: 31-Oct-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) ३१ ऑक्टोबर - गेल्या महिनाभरापासून संघटनांनी दिलेले लढाऊ नेतृत्व, सातत्याने केलेले आंदोलन आणि प्रशासकीय पातळीवरील पाठपुरावा याला अखेर मोठे यश आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि बीएमसीअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व आशा स्वयंसेविकांना ५,००० रुपये दिवाळी बोनस देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या आदेशानुसार प्रशासनाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून, यामुळे मुंबईतील हजारो आशा स्वयंसेविकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.

आंदोलन आणि पाठपुराव्याला शेवटी यश

दिवाळी सण तोंडावर आला असतानाही आशा कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार की नाही, मिळाल्यास तो किती मिळणार, तसेच एनएचएम (NHM) आशांचा यात समावेश असेल की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. या पार्श्वभूमीवर 'मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सिटू)' सातत्याने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाकडे दाद मागत होती.

दिवाळीच्या अवघ्या दोन दिवस आधी सिटू संलग्न आशा युनियनच्या शिष्टमंडळाने आरमायटी इराणी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालयात तळ ठोकून महापालिका प्रशासनाकडे सडेतोड पाठपुरावा केला. या यशस्वी शिष्टमंडळामुळे आणि संघटनांच्या तीव्र दबावामुळे शेवटी प्रशासनाला मान झुकवावी लागली आणि आशा कर्मचाऱ्यांच्या हक्काचा बोनस मंजूर झाला.

आशा स्वयंसेविकांची दिवाळी झाली 'गोड'

आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून तळागाळात अहोरात्र काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच हा दिवाळी बोनस मिळत आहे. युनियनच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे मुंबईतील सर्व एनएचएम व बीएमसी आशांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने 'गोड' झाली आहे.

हक्काचा बोनस पदरात पाडून दिल्याबद्दल आणि आशा कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला यश मिळवून दिल्याबद्दल मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनने (सिटू) माननीय महापौर रितु तावडे आणि महापालिका आयुक्तांचे जाहीर आभार मानले आहेत.

 

Comments

No comments yet.