मुंबई, (प्रतिनिधी) ३० ऑक्टोबर - महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेचा अनमोल ठेवा असलेल्या येवल्याच्या अस्सल पैठणीला आधुनिक फॅशनविश्वात नवी ओळख मिळवून देणारा ‘वीण — द विव्ह’ (VEEN — THE WEAVE) हा विशेष उपक्रम बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये दिमाखात सादर करण्यात आला. ग्रँड हयात, सांताक्रूझ, मुंबई येथे आयोजित या प्रतिष्ठित फॅशन सोहळ्यात भुजबळ इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आणि डॉ. शेफाली भुजबळ यांच्या संकल्पनेतून, प्रसिद्ध डिझायनर पल्लवी गोयल यांनी पैठणीच्या पारंपरिक विणकामाचा आधुनिक फॅशनशी सुरेख संगम घडवून आणला.
महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या आशीर्वादाने साकारलेल्या या उपक्रमातून महाराष्ट्राचा वस्त्रवारसा, सर्जनशीलता आणि विणकरांच्या सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश जागतिक फॅशनविश्वापर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाचे येवला शहराशी विशेष नाते आहे. सन २००४ पासून मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून, गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून त्यांचे या परिसराशी अतूट नाते आहे. पैठणीची समृद्ध परंपरा आणि विणकरांच्या कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्याचा हा अनमोल वारसा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या फॅशन शोचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये येवल्यातून तयार करण्यात आलेल्या अस्सल पैठणी वस्त्रांचा वापर करण्यात आला. पारंपरिक पैठणीच्या वैशिष्ट्यपूर्ण विणकामाला आधुनिक डिझाइनची जोड देत आकर्षक ड्रेप्स, लेहेंगा, फेस्टिव्ह वेअर आणि विविध फॅशन अॅक्सेसरीज साकारण्यात आल्या. पैठणीचे पारंपरिक सौंदर्य, कलात्मकता आणि सांस्कृतिक ओळख कायम ठेवत तिला आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत असे नवे रूप देण्याचा अभिनव प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
या उपक्रमामध्ये विशेषतः महिला विणकरांच्या योगदानाला आणि त्यांच्या कौशल्याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. पैठणीची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी महिला विणकर घेत असलेले कष्ट, त्यांची कलात्मकता, समर्पण आणि कौशल्य यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या हातातील पारंपरिक कलेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कामाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि विणकर समुदायासाठी रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
डॉ. शेफाली भुजबळ यांच्या संकल्पनेतून परंपरेचे जतन करताना तिचा आधुनिक काळाशी संवाद घडवून आणण्याचा दृष्टिकोन या उपक्रमातून अधोरेखित झाला. प्रसिद्ध डिझायनर पल्लवी गोयल यांनी या संकल्पनेला आपल्या सर्जनशील डिझाइनच्या माध्यमातून मूर्त स्वरूप दिले. येवल्याच्या अस्सल पैठणीला आधुनिक पेहरावामध्ये नव्या पद्धतीने सादर करत पारंपरिक विणकामाची जागतिक फॅशनविश्वातील उपयुक्तता आणि आकर्षकता प्रभावीपणे दाखवून दिली.
या शानदार फॅशन शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर उपस्थिती लावली. पारंपरिक पैठणीचा आधुनिक अंदाज आणि भारतीय वस्त्रकलेचे सौंदर्य यांचा संगम असलेल्या या विशेष सादरीकरणामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
‘वीण — द विव्ह’ हा केवळ फॅशन शो नसून, पैठणीच्या मागे असलेल्या हातांचा, त्यांच्या कौशल्याचा आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या परंपरेचा सन्मान करणारा उपक्रम आहे. येवल्याच्या विणकरांनी घडविलेल्या अस्सल पैठणीला आधुनिक फॅशनच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळवून देत या कलेची ओळख नव्या पिढीपर्यंत आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला.
‘वीण — द विव्ह : अ भुजबळ इनिशिएटिव्ह’ या उपक्रमाच्या माध्यमातून येवल्याच्या पैठणीने बॉम्बे टाइम्स फॅशन वीकच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली वेगळी छाप उमटविली. परंपरेचा अभिमान, कारागिरांच्या कलेचा सन्मान आणि आधुनिकतेची नवी दिशा यांचा सुंदर मिलाफ घडविणाऱ्या या उपक्रमामुळे येवल्याच्या पैठणीच्या वैभवाला नव्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
या सोहळ्याला मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री अदिती तटकरे, आ. प्रकाश सुर्वे, आ. मिलिंद नार्वेकर, आ. सत्यजीत तांबे, वर्षा पटेल, अभिनेत्री नेहा पेंडसे, प्राजक्ता दातार यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.