नाशिक पोलिसांना कोर्टाचा दणका... दिले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 30-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) ३० ऑक्टोबर - लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक करणे, मोबाईल चोरी करून डिजिटल वॉलेटवरून पैसे परस्पर काढून घेणे आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा खंडणी मागण्याचा एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणाने पोलीस प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय न मिळाल्याने अखेर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पाच जणांच्या टोळक्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

जळगाव जिल्ह्यातील पारोळा (जि. जळगाव) येथील रहिवासी यशवंत भीमराव महाजन (वय ३२) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी दोन लाख रुपये घेऊन २६ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंत महाजन यांचा विवाह प्रतिक्षा लोंढे नावाच्या महिलेशी लावून दिला होता.

विवाह झाल्यानंतर २५ सप्टेंबर २०२४ रोजी महाजन दांपत्य देवदर्शनासाठी सप्तशृंगी गडावर गेले होते. त्यावेळी लग्नात 'कलवरी' म्हणून सोबत आलेल्या रूपाली भालेराव हिच्या मदतीने यशवंत महाजन यांचा मोबाईल चोरण्यात आला. त्यानंतर भामट्यांनी त्या मोबाईलचा गैरवापर करत 'फोन पे' (PhonePe) द्वारे प्रथम २ हजार रुपये आणि नंतर ५ हजार रुपये परस्पर स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले.

पैसे लाटून पुन्हा २ लाखांची मागणी व जीवे मारण्याची धमकी

मोबाईलमधून पैसे चोरीला गेल्याची बाब निदर्शनास येताच यशवंत महाजन यांनी या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित आरोपी खंडू दाते याने महाजन यांच्याशी संपर्क साधून, माहेरी आलेल्या प्रतिक्षाला सुखरूप परत पाठवण्याच्या मोबदल्यात पुन्हा २ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

या फसवणुकीला बळी न पडता महाजन यांनी नोव्हेंबर २०२५ मध्येच पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र, त्यावेळी त्यांना न्याय मिळाला नाही. उलट आपण पोलिसांत तक्रार केल्याचे समजताच दाते दांम्पत्याने महाजन यांना फोन करून अत्यंत अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

न्यायालयाच्या आदेशानंतर ५ संशयितांवर गुन्हा दाखल

पोलीस प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने भेदरलेल्या यशवंत महाजन यांनी न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर नुकतीच सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार पंचवटी पोलिसांनी खालील पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे:

१. सुनंदा रायबा पाटील (रा. खेडी, भुसावळ रोड, जळगाव)

२. खंडू रंगनाथ दाते - सोनवणे (रा. ओझर मिग, ता. निफाड, नाशिक)

३. संगिता खंडू दाते - सोनवणे (रा. ओझर मिग, ता. निफाड, नाशिक)

४. रूपाली योगेश भालेराव (रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर)

५. प्रतिक्षा यशवंत महाजन उर्फ प्रतिक्षा नितीन लोंढे (रा. गणेशनगर, लक्ष्मी टॉवर जवळ, जत्रा हॉटेल, नाशिक)

या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

 

Comments

No comments yet.