छोटा हत्ती टेम्पोची परस्पर विक्री... असे झाले उघड...

Share:
Main Image
Last updated: 29-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑक्टोबर - फायनान्स कंपनीचे हप्ते फेडण्याचे आमिष दाखवून एका महिलेचा मालवाहू 'छोटा हत्ती' टेम्पो स्वतःच्या वाहन बाजारात विक्रीसाठी ठेवून, त्याची परस्पर विक्री करत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वाहन बाजार संचालकाविरोधात अपहाराचा (फसवणुकीचा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र शिवाजी अहिरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वाहन बाजार संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारती प्रविण पवार (रा. शक्तीनगर, हिरावाडी, नाशिक) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रविंद्र अहिरे याचा नांदूरनाका परिसरात 'बाफना मोटर्स' नावाचा जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा (वाहन बाजार) व्यवसाय आहे. फिर्यादी भारती पवार यांना कौटुंबिक व आर्थिक अडचण असल्याने त्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या मालकीचा मालवाहू 'छोटा हत्ती' टेम्पो (क्रमांक MH 15 FV 8851) विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार त्यांनी संशयिताशी संपर्क साधला असता, संशयित अहिरे याने 'ब्लॅक बोर्ड' नावाच्या फायनान्स कंपनीचे उर्वरित सर्व हप्ते मी स्वतः किंवा नवीन खरेदीदार भरेल, अशा अटी व शर्तींवर टेम्पोची विक्री करून देण्याचे आश्वासन दिले. या बतावणीवर विश्वास ठेवून पवार यांनी आपला टेम्पो बाफना मोटर्समध्ये विक्रीसाठी लावला होता.

असा उघडकीस आला प्रकार

डिसेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संशयित रविंद्र अहिरे याने सदर टेम्पोची परस्पर विक्री केली. मात्र, कराराप्रमाणे 'ब्लॅक बोर्ड' फायनान्स कंपनीचे ठरलेले हप्ते भरले नाहीत. दरम्यानच्या काळात फायनान्स कंपनीने मूळ मालक असलेल्या भारती पवार यांच्याकडे थकीत हप्त्यांसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली.

आपली फसवणूक झाल्याचे आणि टेम्पोचा अपहार करण्यात आल्याचे लक्षात येताच पवार यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित रविंद्र अहिरे याच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजूळे करत आहेत.

 

Comments

No comments yet.