त्र्यंबकेश्वर मंदिर इतके दिवस बंद राहणार... जिल्हा प्रशासनाने काढले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 30-Oct-2026

 

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ३० ऑक्टोबर - नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७ अंतर्गत आयोजित सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्वसामान्य भाविकांसाठी बंद राहणार आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देश आणि राज्यातील अतिमहत्त्वाच्या (VVIP) व्यक्तींच्या दौऱ्यानिमित्त कायदा, सुव्यवस्था आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३' च्या कलम १६३ अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

नेमके काय आहे कारण?

येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर कुंभमेळ्याचा सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपतींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री आणि अतिमहत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेची खबरदारी, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि संभाव्य गर्दीचे काटेकोर नियंत्रण करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली होती.

पोलीस व देवस्थान ट्रस्टच्या अहवालानंतर निर्णय

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी २९ ऑक्टोबर रोजी सादर केलेल्या अहवालात व्हीव्हीआयपी सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी मंदिर दोन दिवस बंद ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सचिवांनीही पत्र देऊन, स्थानिक रहिवासी वगळता इतर भाविकांसाठी दर्शन बंद ठेवून केवळ अधिकृत पासधारकांनाच प्रवेश देण्यास सहमती दर्शविली होती.

त्यापूर्वी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा करून कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश काढण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. या सर्व अहवालांचा विचार करून जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला.

दर्शनाबाबतचे नेमके निर्बंध काय?

 * कालावधी: दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपासून ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत (किंवा कार्यक्रम संपेपर्यंत) हे आदेश लागू राहतील.

 * प्रवेशाचे नियम: या कालावधीत सचिव (त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट) आणि पोलीस निरीक्षक (त्र्यंबकेश्वर) यांनी निर्गमित केलेले अधिकृत दर्शन पास ज्यांच्याकडे नाहीत, अशा सर्व सामान्य नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी मंदिर पूर्णपणे बंद राहील.

 * स्थानिक नागरिक व पासधारक: केवळ प्रशासनाने दिलेले अधिकृत दर्शन पासधारकच मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतील.

उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता २०२३' चे कलम २२३ तसेच 'महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१' चे कलम १३४ अन्वये कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, देशभरातून येणाऱ्या भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि जिल्हा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे. स्थानिक पोलीस ठाणे, नगरपालिका आणि देवस्थान प्रशासनाला या आदेशांची चोख अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

Comments

No comments yet.