नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑक्टोबर - राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी (Shalarth ID) घोटाळा प्रकरणात नाशिकरोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळगावमधील ११ शाळांमधील ९५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बनावट नियुक्त्या करून शासनाची १० कोटी ९ लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी, सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा (वय ५८) याला आंबेजोगाई (जि. बीड) येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीस ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घोटाळ्याचे स्वरूप आणि आर्थिक फसवणूक:
नाशिक विभागांतर्गत जळगाव जिल्ह्यातील ११ शाळांमधील ९५ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना आणि शालार्थ प्रस्तावांना कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता नसताना, मागील तारखांचे बनावट आदेश तयार करून शालार्थ प्रणालीमध्ये त्यांच्या नोंदी करण्यात आल्या. उपसंचालक कार्यालयाकडील मूळ मंजुरी आदेश नसताना आणि कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता या कर्मचाऱ्यांना वेतन व थकबाकीच्या स्वरूपात शासनाची रु. १०,०९,५३,६४९/- इतकी रक्कम बेकायदेशीरपणे अदा करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी आतापर्यंत मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षण विभागाचे अधिकारी व वेतन अधीक्षकांसह सुमारे १४५ संशयित आरोपी निष्पन्न झाले असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस पथकाची कारवाई:
गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल जगजाप, संदीप भुरे, राकेश राऊत व गुरु गांगुर्डे यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे शोध घेऊन आरोपी राजमोहन शर्मा यास ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक व पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.