तलाठ्याने शेतकऱ्याकडे मागितली १५०० रुपयांची लाच... असा सापडला रंगेहाथ...

Share:
Main Image
Last updated: 29-Oct-2026

 

विलास कांबळे, (येवला) २९ ऑक्टोबर - आईच्या वाट्याची जमीन हक्कसोड दस्त नोंदवून मुलाच्या नावे ७/१२ उताऱ्यावर नोंदवून देण्यासाठी आणि आईचे नाव कमी करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. राहुल प्रल्हाद रींडे (वय ४४, रा. स्वामी समर्थ केंद्र, विठ्ठलनगर, येवला) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून, ते चिचोंडी बुद्रुक सजा येथे कार्यरत आहेत. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळ तक्रारदाराने आईच्या हिश्श्याची जमीन दुय्यम निबंधक कार्यालय, येवला येथे ८ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत हक्कसोड दस्त नोंदवून घेतली होती. त्यानुसार मौजे चिचोंडी बुद्रुक येथील गट नं. ३८/४ मधील २ हेक्टर २२ आर क्षेत्रातील आईचा हिस्सा तक्रारदाराच्या नावे करण्यात आला होता. सदर हक्कसोड दस्ताच्या आधारे सातबारा उताऱ्यावर आईचे नाव कमी करून तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी तक्रारदाराने १० सप्टेंबर २०२६ रोजी चिचोंडी सजाचे तलाठी राहुल रींडे यांच्याकडे रीतसर अर्ज सादर केला होता.

त्यावेळी तलाठी रींडे यांनी तक्रारदाराला २१ दिवसांनंतर येण्यास सांगितले. मुदत संपल्यानंतर तक्रारदार जेव्हा तलाठ्यास भेटले, तेव्हा "तुमचे काम करून दिले आहे, त्याबदल्यात २ हजार रुपये द्यावे लागतील," अशी लाचेची मागणी तलाठी राहुल रींडे यांनी केली. लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने तक्रारदाराने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली.

पडताळणीत तडजोड, कार्यालयातच लाच स्वीकारली

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने २८ ऑक्टोबर रोजीच पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत तलाठी राहुल रींडे यांनी ७/१२ वरील नाव बदलून दिल्याच्या मोबदल्यात सुरुवातीला २ हजार रुपये मागितल्याचे आणि तडजोडीअंती १ हजार ५०० रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पथकाने चिचोंडी बुद्रुक येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून तडजोडीनुसार १ हजार ५०० रुपयांची लाच पंच साक्षीदारांच्या समक्ष स्वतःसाठी स्वीकारताना दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी राहुल रींडे यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

यांनी केली कारवाई

सदर यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस उपअधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या नेतृत्वात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्यासह पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके आणि पोलीस अंमलदार योगेश शिंदे यांनी ही कामगिरी पार पाडली.

कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा दाखल्यासाठी लोकसेवक किंवा दलालाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी टोल फ्री क्र. १०६४ अथवा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (९९३०९९७७०० / ९५४५०३१०६४) तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.