सिंहस्थ ध्वजारोहणामुळे नाशिक शहरातील हे रस्ते पूर्णपणे बंद... असे आहेत वाहतुकीत मोठे बदल...

Share:
Main Image
Last updated: 30-Oct-2026

 

मनोहर शिंदे, (नाशिक) ३० ऑक्टोबर - नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणाऱ्या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा आणि सायंकाळच्या भव्य गोदा आरतीसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने वाहतुकीचे काटेकोर नियोजन केले आहे. या दिवशी रामकुंड व गोदावरी घाट परिसराकडे जाणारे अनेक प्रमुख रस्ते सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, विविध भागांतून येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र वाहनतळ (पार्किंग) आणि तेथून पायी जाण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे (प्रेस नोट क्र. ३८४) ही सविस्तर नियमावली जाहीर केली आहे.

१. सकाळचा ध्वजारोहण कार्यक्रम: भाविकांची पार्किंग व पायी मार्ग व्यवस्था

 * गंगापूर रोडकडून येणारी वाहने: गुरांचा दवाखाना व सिद्धेश्वर मंदिरमार्गे येणारी वाहने संभाजी महाराज गार्डन येथे पार्क केली जातील. भाविकांनी अहिल्यादेवी होळकर पुलाखालून एकमुखी दत्त घाटमार्गे गांधी तलावाकडे पायी जावे.

 * अशोक स्तंभाकडून येणारी वाहने: वाहने रविवार कारंजा येथे पार्क होतील. भाविकांनी सराफ बाजार, सरकारवाडा पोलीस चौकी, भांडी बाजार, बालाजी मंदिर व निळकंठेश्वर घाटमार्गे गांधी तलावाकडे पायी जावे.

 * शिवाजी महाराज स्टेडियम व बी. डी. भालेकर मैदान: येथे वाहने लावून भाविकांनी रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ टी-पॉइंट, नेहरू चौक, दिल्ली दरवाजामार्गे रोकडोबा मैदानाकडे पायी जावे.

 * अशोक स्तंभ - राठी स्कूल मैदान: येथे पार्किंग करून सिद्धेश्वर मंदिर, संभाजी महाराज गार्डन, अहिल्यादेवी होळकर पुलाखालून एकमुखी दत्त घाटमार्गे गांधी तलावाकडे पायी मार्ग राहील.

 * तपोवन, मुंबई-आग्रा महामार्ग व गणेशवाडी परिसर: महामार्गाच्या पुलाखालून स्वामीनारायण मंदिर, अमरधाममार्गे येणारी वाहने 'शिंदे मळा' येथे पार्क केली जातील. गणेशवाडीकडून येणारी वाहने गौरी पटांगणावर पार्क होतील. तेथून भाविक म्हसोबा पटांगण व जुने भाजी पटांगणमार्गे पायी जाऊ शकतील.

२. सकाळच्या सत्रात नागरिकांसाठी बंद राहणारे रस्ते

सकाळच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान खालील मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील:

 * रविवार कारंजा - अहिल्याबाई होळकर ब्रिज - मालेगाव स्टँड - पंचवटी कारंजा - दिंडोरी नाका

 * मखमलाबाद नाका - मालेगाव स्टँड - रामकुंड - सरदार चौक

 * रामकुंड - मालवीय चौक - पंचवटी कारंजा

 * शनी चौक ते रामकुंड

 * गाडगे महाराज पूल व रामसेतू पूल (दोन्ही बाजू बंद)

३. सायंकाळची महा गोदा आरती: दुपारी २ नंतरचे निर्बंध

सायंकाळच्या गोदा आरतीसाठी तपोवन, ट्रॅक्टर हाऊस आणि काट्या मारुती चौकातून येणाऱ्या वाहनांसाठी शिंदे मळा व श्रद्धा लॉन्स येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, तेथून गौरी पटांगण व जुने भाजी पटांगणमार्गे पायी प्रवेश असेल.

दुपारी २.०० वाजेनंतर खालील रस्ते बंद राहतील:

 * एकमुखी दत्त मंदिर - गांधी तलाव - कापूरथळा मैदान - रोकडोबा मैदान घाट

 * गुरांचा दवाखाना - घारपुरे घाट - सिद्धेश्वर मंदिर - फनीबाबा दर्गा - डांगर उतार - एकमुखी दत्त मंदिर

 * रविवार कारंजा - मंगेश मिठाई - सराफ बाजार - भांडी बाजार - बालाजी मंदिर

 * रविवार कारंजा - मेन रोड - धुमाळ पॉईंट

 * धुमाळ पॉईंट - प्रकाश सुपारी - नेहरू चौक - दिल्ली दरवाजा मार्ग दुपारी २ ते ५ या वेळेत बंद राहील; मात्र सायंकाळी ५ नंतर दिल्ली दरवाजा व सांडवा पुलावरून गौरी पटांगणाकडे नागरिकांना पायी प्रवेश खुला केला जाईल.

 * याशिवाय सकाळी बंद असलेले सर्व पूल (होळकर ब्रिज, गाडगे महाराज पूल, रामसेतू) आणि पंचवटी कारंजा-रामकुंड मार्ग सायंकाळीही बंद राहतील.

प्रशासकीय आवाहन:

कुंभमेळ्याच्या पहिल्या ध्वजारोहण व गोदा आरतीच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी निश्चित केलेल्या अधिकृत पार्किंगचाच वापर करावा, बंद रस्त्यांवर वाहने आणणे टाळावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले आहे.

 

Comments

No comments yet.