शिक्षकांनो आता झेडपीमध्ये जाण्याची गरज नाही... सर्व कामे अशी होणार...

Share:
Main Image
Last updated: 28-Oct-2026

 

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २८ ऑक्टोबर - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आपल्या प्रशासकीय व सेवाविषयक कामांसाठी आता वारंवार जिल्हा परिषद कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही. दुर्गम भागातून येणाऱ्या शिक्षकांचा वेळ, पैसा आणि होणारा मनस्ताप वाचवण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ‘ई-व्हिजिट’ (e-Visit) हा अत्यंत अभिनव आणि डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य निर्णय घेण्यात आला असून, केवळ एका QR कोडच्या स्कॅनिंगद्वारे शिक्षकांना आपल्या प्रलंबित कामांची माहिती प्रशासनाकडे थेट नोंदवता येणार आहे.

शिक्षकांचे श्रम आणि वेळ वाचणार; रजा घेण्याची गरज नाही

नाशिक जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण यांसारख्या अत्यंत दुर्गम आणि दूरवरच्या भागांतून शिक्षकांना प्रशासकीय कामांसाठी नाशिक मुख्यालयात यावे लागते. यामध्ये शिक्षकांचा मोठा वेळ, प्रवास खर्च आणि शारीरिक श्रम तर वाया जातातच, शिवाय कामासाठी शाळा सोडून रजा घ्यावी लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचाही प्रश्न निर्माण होत असे.

शिक्षकांची ही अडचण लक्षात घेऊन प्रशासकीय कामकाजात सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने 'ई-व्हिजिट'ची ही डिजिटल संकल्पना अमलात आणली आहे. यामुळे शिक्षकांना आपल्या कार्यस्थळावरूनच थेट प्रशासनाशी संवाद साधता येणार आहे.

'ई-व्हिजिट' उपक्रम नक्की कसा कार्य करणार?

QR कोडद्वारे नोंदणी: प्राथमिक शिक्षण विभागातर्फे एक विशेष QR कोड जारी करण्यात आला आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांनी मोबाईलद्वारे हा QR कोड स्कॅन करायचा आहे.

प्रलंबित कामांची माहिती: स्कॅन केल्यानंतर उघडणाऱ्या ऑनलाइन फॉर्ममध्ये आपल्या प्रलंबित कामाचा किंवा समस्येचा सविस्तर तपशील नोंदवायचा आहे.

गटशिक्षणाधिकारी ते जिल्हा परिषद स्तरावरील कामे: विशेष म्हणजे केवळ जिल्हा परिषद मुख्यालयातीलच नाही, तर तालुका स्तरावरील पंचायत समिती शिक्षण विभागातील प्रलंबित कामांची नोंदही या प्रणालीद्वारे करता येईल.

जलद निपटारा: प्राप्त अर्जांचा आढावा घेऊन जिल्हा परिषद प्रशासन त्या प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी थेट पावले उचलेल.

डिजिटल आणि पारदर्शक प्रशासनाकडे पाऊल

प्रशासकीय कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा अधिक प्रतिसादक्षम आणि सुलभ करण्यावर नाशिक जिल्हा परिषदेचा भर आहे. या उपक्रमामुळे शिक्षकांना वारंवार चकरा मारण्यापासून मुक्ती मिळणार असून, प्रशासकीय प्रक्रियेत मोठा पारदर्शकपणा येणार आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आवाहन

शिक्षकांनी आपल्या प्रलंबित प्रशासकीय व सेवाविषयक कामांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात येण्यापूर्वी या आधुनिक यंत्रणेचा प्राधान्याने वापर करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सरोज जगताप यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या या शिक्षकस्नेही उपक्रमाचे नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक आणि शैक्षणिक वर्तुळातून जोरदार स्वागत केले जात आहे.

 

Comments

No comments yet.