डोहाळे जेवण, सोनोग्राफी आणि मोफत प्रसूती... महिलांना एवढी सुविधा देणाऱ्या हॉस्पिटलची चर्चा तर होणारच...

Share:
Main Image
Last updated: 28-Oct-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ ऑक्टोबर - ग्रामीण भागातील गरजू आणि सर्वसामान्य महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलने एक अत्यंत दिलासादायक आणि लोकोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी नॉर्मल (प्राकृतिक) प्रसूती असो वा सिझेरियन (शस्त्रक्रिया) असो, दोन्ही प्रकारच्या प्रसूती पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत या हॉस्पिटलच्या माध्यमातून तब्बल २ हजारहून अधिक महिलांची प्रसूती पूर्णपणे मोफत करण्यात आली असून, ग्रामीण भागातील शेकडो कुटुंबांवरील उपचाराचा मोठा आर्थिक भार यामुळे टळला आहे.

मोफत सोनोग्राफी व प्रसूतीपूर्व (ANC) सेवांचा लाभ

केवळ प्रसूतीच नव्हे, तर गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात गर्भाची योग्य वाढ, प्रकृतीची तपासणी आणि कोणतीही गुंतागुंत होऊ नये यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या चारही सोनोग्राफी तपासण्या एसएमबीटीमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हॉस्पिटलच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५,००० हून अधिक एएनसी (ANC) रुग्ण महिलांनी प्रसूतीपूर्व सेवांचा लाभ घेतला असून, माता व बालकाच्या सुरक्षेसाठी १८,००० हून अधिक सोनोग्राफी मोफत करण्यात आल्या आहेत.

अनोख्या डोहाळे जेवणातून मानसिक आधार व मार्गदर्शन

गर्भवती महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांना हसरा व सकारात्मक मानसिक आधार देण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांत २४ हून अधिक वेळा अनोख्या डोहाळे जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाबाबत बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. किरण राजोळे म्हणाले, "गरोदरपणात अनेक महिलांना आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी याची कल्पना नसते. डोहाळे जेवणाच्या माध्यमातून एकीकडे त्यांचे डोहाळे पुरवले जातात, तर दुसरीकडे त्यांना आरोग्याविषयी मोलाची माहिती दिली जाते. तसेच स्त्रीरोग विभागातील विद्यार्थ्यांनाही रुग्णांप्रती माणुसकी, करुणा आणि सहानुभूतीचा पाठ याद्वारे मिळतो."

या कार्यक्रमादरम्यान महिलांचा आत्मविश्वास वाढवून गर्भसंस्कारांचे महत्त्व, बाळाचा बौद्धिक व मानसिक विकास, गरोदरपणात घ्यावयाची काळजी, नियमित व्यायाम, आहारविषयक समुपदेशन, हाय रिस्क प्रेग्नन्सी, अकाली जन्मलेले बाळ, एनआयसीयू (NICU) सुविधा, बालशस्त्रक्रिया, लसीकरण तसेच ॲनिमिया टाळण्यासाठी घ्यावयाचा सकस आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाते.

आरोग्यमित्रांचे प्रभावी जाळे आणि शून्य ते १६ वर्षे बालकांवर मोफत उपचार

या लोककल्याणकारी मोहिमेला यश मिळवून देण्यात गावोगावी कार्यरत असलेल्या आरोग्यमित्रांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ग्रामीण भागातील गरजू महिलांचा शोध घेऊन त्यांना वेळेवर तपासणीसाठी हॉस्पिटलपर्यंत आणणे आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे, हे काम आरोग्यमित्र निष्ठेने करत आहेत.

विशेष म्हणजे, केवळ माताच नव्हे तर जन्माला येणाऱ्या नवजात अर्भकापासून ते सोळा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेतली जात आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये शून्य ते १६ वर्षांच्या बालकांसाठी लागणारे सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार, औषधोपचार आणि आपत्कालीन सेवा पूर्णपणे मोफत आहेत. याविषयी बोलताना एसएमबीटी हॉस्पिटलचे आरोग्यसेवा संचालक सचिन बोरसे म्हणाले,

"कुपोषणमुक्तीपासून ते लहान मुलांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आणि तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञांमार्फत उपचार केले जातात. बालकांचे आरोग्य निरोगी आणि सुरक्षित ठेवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे."

एसएमबीटी हॉस्पिटलच्या या सर्वसमावेशक आणि मोफत आरोग्य सेवांमुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबांवरील कर्जाचा बोजा टळला असून, माता व बालकांच्या सुरक्षित आणि आनंदी बाळंतपणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.

Comments

No comments yet.