नाशिक, (प्रतिनिधी) ३० ऑक्टोबर - आगामी 'सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७' च्या धर्तीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध अध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख देश-विदेशात पोहोचवण्यासाठी भारतीय टपाल विभागाने एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. नाशिकचे पवित्र रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त तीर्थ या दोन ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर आधारित विशेष ‘माय स्टॅम्प’ (विशेष टपाल तिकिटे) तयार करण्यात आली आहेत. आगामी ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सिंहस्थ महाकुंभ ध्वजारोहण सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर या तिकिटांचे अधिकृत अनावरण केले जाणार आहे.
या विशेष टपाल तिकिटांच्या माध्यमातून सिंहस्थाची प्रदीर्घ अध्यात्मिक परंपरा, नाशिक-त्र्यंबकेश्वरचे महात्म्य आणि धार्मिक वारसा राष्ट्रीय स्तरावर नव्याने अधोरेखित होणार आहे.
रामकुंडातून वैष्णव संप्रदायाचे तेज
नाशिकमधील गोदावरी पात्रातील रामकुंड हे वैष्णव संप्रदायाचे सर्वोच्च आणि अत्यंत पवित्र स्नानस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. सिंहस्थ महाकुंभाच्या काळात येथे वैष्णव अखाड्यांच्या साधू-संतांचे भव्य शाही स्नान (अमृतस्नान) पार पडते. रामतीर्थाची ऐतिहासिक वास्तुरचना, तीर्थाचे पौराणिक पावित्र्य आणि कुंभमेळ्याशी असलेले त्याचे अतूट नाते या विशेष टपाल तिकिटावर अत्यंत सुरेखपणे चित्रित करण्यात आले आहे. या तिकिटामुळे नाशिकच्या वैष्णव परंपरेचे दर्शन आता देशभरातील नागरिकांना होणार आहे.
कुशावर्त तीर्थातून शैव परंपरेचा समृद्ध वारसा
दुसरीकडे, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ हे शैव साधू-संतांच्या शाही स्नानाचे प्रमुख केंद्र आहे. कुशावर्त तीर्थाची प्राचीन वास्तुरचना आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिमाखात उभी असलेली ब्रह्मगिरी पर्वतरांग यांचे निसर्गरम्य दृश्य या टपाल तिकिटावर साकारण्यात आले आहे. कुशावर्त तीर्थाच्या या तिकिटामुळे सिंहस्थातील शैव परंपरेचा, संतांच्या तपाचा आणि निसर्गाचा अद्वितीय मेळ टपाल तिकिटाच्या रूपात अमर होणार आहे.
दोन्ही मुख्य परंपरांचा सुवर्णयोग
सिंहस्थ महाकुंभाच्या परंपरेत शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एका बाजूला वैष्णव परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे रामतीर्थ, तर दुसऱ्या बाजूला शैव परंपरेचे केंद्र असलेले कुशावर्त तीर्थ, या दोन्ही प्रमुख ठिकाणांना भारतीय टपाल विभागाने 'माय स्टॅम्प' योजनेत समाविष्ट करून संपूर्ण महाकुंभाचा अध्यात्मिक गाभा एकाच उपक्रमात गुंफला आहे.
"सिंहस्थाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार" – आयुक्त शेखर सिंह
या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त करताना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले,
"सिंहस्थ महाकुंभमेळा हा केवळ एक उत्सव नसून तो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर आधारित ही विशेष टपाल तिकिटे या पवित्र भूमीचे महत्त्व व्यापक स्तरावर नेण्यास मदत करतील. टपाल तिकिटे हे केवळ पत्रांवर लावायचे माध्यम नसून देशाचा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचे एक प्रभावी साधन आहे. या उपक्रमामुळे सिंहस्थाची महान परंपरा भावी पिढ्यांपर्यंत आणि जगभरातील टपाल तिकीट संग्रहकांपर्यंत (Philatelists) अत्यंत प्रभावीपणे पोहोचेल."
३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर ही विशेष टपाल तिकिटे नागरिकांसाठी तसेच तिकीट संग्रहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून, या उपक्रमाचे नाशिककरांमधून मोठे स्वागत होत आहे.