अक्षय काळे, (मुंबई) २७ ऑक्टोबर - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) दीर्घकाळापासून सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तांत्रिक खंड वगळून १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या तब्बल १४ हजार ७८७ पात्र कर्मचाऱ्यांसाठी एकवेळची विशेष बाब म्हणून 'समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे' (Supernumerary Posts) निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी लागणाऱ्या वार्षिक ९८३.८० कोटी रुपये इतक्या मोठ्या खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
नियमित पदांनुसार मिळणार समकक्ष वेतनश्रेणी
या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पात्र कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि इतर संबंधित विभागांतील समकक्ष नियमित मंजूर पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार वेतनश्रेणी लागू केली जाईल. या संपूर्ण योजनेअंतर्गत अपेक्षित वेतनासाठी ९७८.८० कोटी रुपये आणि प्रवास भत्त्यासाठी ५ कोटी रुपये असा एकूण ९८३.८० कोटी रुपयांचा वार्षिक खर्च अपेक्षित आहे.
वेतनास संरक्षण; 'या' अटी असणार लागू
* वेतन संरक्षण व भत्ते: या कर्मचाऱ्यांचे सध्या मिळणारे मूळ वेतन पूर्णपणे संरक्षित राहील. तसेच त्यांना महागाई भत्ता (DA) आणि प्रवास भत्ता (TA) लागू राहील. अभियानांतर्गत सध्या देय असलेल्या रजाही त्यांना अनुज्ञेय असणार आहेत.
* पदोन्नती व निवृत्तीवेतन नाही: या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्ती वेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन (Pension) योजनेचा लाभ मिळणार नाही.
* पदे व्यक्तिसापेक्ष: ही पदे पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असणार आहेत. म्हणजेच संबंधित कर्मचारी सेवेत कार्यरत असेपर्यंतच ती पदे अस्तित्वात राहतील.
* पद रद्द होणे व अनुकंपा: कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण किंवा दुर्दैवी मृत्यूमुळे पद रिक्त झाल्यास ते आपोआप व्यपगत (रद्द) होईल आणि त्यावर नवीन नियुक्ती केली जाणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीचा हक्क राहणार नाही.
पूर्वोदाहरण म्हणून वापर करता येणार नाही
शासनाने ही पदनिर्मिती अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आणि 'एकवेळची विशेष बाब' (One-time special case) म्हणून मंजूर केली आहे. त्यामुळे इतर कोणत्याही विभागातील योजना किंवा प्रयोजनासाठी या निर्णयाचा पूर्वोदाहरण (Precedent) म्हणून आधार घेता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
"सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार" – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
या निर्णयावर बोलताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, "राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ हजार ७८७ अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख होण्यास मोठी मदत होईल."
दीर्घ काळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.