इन्स्टाग्रामवर महिलेचे अश्लील फोटो अन् व्हिडीओ व्हायरल... नाशकातील धक्कादायक प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 27-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑक्टोबर - सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची बदनामी करण्याचे आणि त्यांचा छळ करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे.

सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करून एका विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आला. या महिलेचे अश्लील फोटो व व्हिडीओ तिच्या पतीसह नातेवाइकांना पाठवून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

इतकेच नव्हे, तर या विकृत कृत्याचा जाब विचारण्यासाठी संपर्क साधणाऱ्या महिलेच्या पतीला आरोपीने थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेक आयडीवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट अन् छेडछाड

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनीत बालकृष्ण बागुल (रा. इगतपुरी, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक शहरातील एका पीडित विवाहित महिलेने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित विनीत बागुल याने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका बनावट (फेक) अकाऊंटद्वारे पीडित महिलेला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरील फोटोंशी छेडछाड करत त्यावर अत्यंत अश्लील लिखाण केले.

फॉलोअर्स अन् पतीला पाठवले अश्लील व्हिडीओ

संशयिताचे विकृत कृत्य एवढ्यावरच थांबले नाही, तर त्याने पीडित महिलेच्या पतीलह तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत (Follow List) असलेल्या अनेक नातेवाइकांना व मित्रांना पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडीओ मॅसेजद्वारे पाठवून तिची मोठी बदनामी केली आणि विनयभंग केला.

जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी

सोशल मीडियावर हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येताच, पीडितेच्या पतीने अत्यंत संतापाने गेल्या शुक्रवारी (दि. १६) संशयित विनीत बागुल याच्याशी फोनद्वारे संपर्क साधला आणि या बदनामीचा जाब विचारला. मात्र, स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी संशयिताने पीडितेच्या पतीलाच शिवीगाळ करत थेट जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. म्हसरूळ पोलिसांनी संशयित आरोपी विनीत बागुल याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विनयभंग व धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सायबर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

 

Comments

No comments yet.