नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑक्टोबर - शहर व परिसरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, आता महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील लवाटेनगर भागातील एका बांधकाम साईटवर पडलेले ३० क्विंटल वजनाचे लोखंडी गज आणि स्क्रॅप साहित्य तीन भामट्या महिलांनी हातोहात लांबवले आहे. सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या या मुद्देमालाची चोरी महिलांनी अत्यंत चलाखीने रिक्षातून केली. चोरीचा हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा पर्दाफाश
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश दिनकर कापसे (वय ४०, रा. मेहरधाम, पेठरोड) हे जुने बांधकाम तोडण्याच्या व्यवसायात आहेत. त्यांनी लवाटेनगर येथील सिटी सेंटर मॉल परिसरात एका जुन्या इमारतीचे पाडकाम (डीमॉलिशन) करण्याचे काम घेतले होते. काम सुरू असताना साईटवर मोठ्या प्रमाणावर लोखंडी गज आणि इतर स्क्रॅप मटेरियल साचले होते.
दरम्यान, संधी साधून तीन भामट्या महिलांनी या साईटवर प्रवेश केला आणि तिथे ठेवलेले सुमारे ३० क्विंटल वजनाचे लोखंडी गज व स्क्रॅप साहित्य चोरून नेले. हे सर्व साहित्य रिक्षात भरून त्यांनी पोबारा केला. साईटवरून साहित्य गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर कापसे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, हा चोरीचा प्रकार स्पष्ट झाला.
गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरेश कापसे यांनी तातडीने गंगापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित महिलांपैकी एका महिला चोराची ओळख पटली आहे. शोभा कचरू इरचे (वय ४०, रा. राजीवनगर झोपडपट्टी, इंदिरानगर) आणि तिच्यासोबत असलेल्या अन्य दोन अनोळखी महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाचालकाचाही शोध सुरू
दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीमुळे लवाटेनगर व सिटी सेंटर मॉल परिसरात व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर (३० क्विंटल) लोखंडी साहित्य रिक्षातून नेण्यात आल्यामुळे या गुन्ह्यात रिक्षाचालकाचाही सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, संशयित महिलांचा आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.