नाशिक, (प्रतिनिधी) २६ ऑक्टोबर - पहिले लग्न कायम असताना आणि न्यायालयामध्ये घटस्फोटाचा (Divorce Case) दावा प्रलंबित असतानाच पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसऱ्या लग्नाचा घाट घालणाऱ्या एका तरुणाचा डाव भलताच अंगलट आला आहे. या संपूर्ण प्रकाराची गुप्त माहिती मिळताच पहिल्या पत्नीने थेट लग्न मंडपात धडक देऊन हायव्होल्टेज ड्रामा घडवून आणला. या गोंधळामुळे वऱ्हाडी मंडळींमध्ये मोठी बाचाबाची होऊन अखेर विवाह सोहळा उधळला गेला. याप्रकरणी पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात वरपक्षाविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हा सर्व प्रकार मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या हॉटेल सेव्हन हेवन येथील लग्न मंडपात घडला. एका तरुणाचा आपल्या पहिल्या पत्नीसोबतचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. अद्याप कायदेशीररीत्या कोणताही घटस्फोट झालेला नसताना, संशयित पतीने एका दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याचे निश्चित केले आणि हॉटेल सेव्हन हेवन येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, पतीच्या या गुप्त दुसऱ्या विवाहाची भणक पहिल्या पत्नीला लागली. कोणताही उशीर न करता पहिल्या पत्नीने थेट लग्न मंडपात धाव घेतली आणि संशयित पतीचा आणि वरपक्षाचा बुरखा टरकावला. पहिल्या पत्नीने पहिल्या विवाहाचा कायदेशीर घटस्फोट झाला नसल्याचा ठोस दावा करत या विवाहावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच या दांपत्याला सहा वर्षांचा मुलगा असल्याचेही तिने वऱ्हाडी मंडळींसमोर सांगताच मंडपात एकच खळबळ उडाली.
खुर्च्यांची फेकाफेकी; पाहुण्यांची धूम ठोकली
पहिल्या पत्नीने घेतलेल्या आक्षेपानंतर दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये वादावादी सुरू झाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत आणि गोंधळात झाले. रागाच्या भरात लग्न मंडपात खुर्च्यांची फेकाफेकी झाली, ज्यामुळे शुभकार्याचा मंडपालगतचा भाग रणसंग्रामाचे मैदान बनला. हा भयानक आणि अभूतपूर्व गोंधळ पाहून लग्नाला आलेले पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळी न जेवताच, आहेर बाजूला ठेवून तेथून सुरक्षितपणे पसार झाले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही कल्पना दुसऱ्या तरुणीला व तिच्या कुटुंबाला नव्हती, असे समजते. गोंधळानंतर दुसऱ्या बाजूला देखील पहिल्या विवाहाबाबतची खरी माहिती देण्यात आली आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या संपूर्ण हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पहिल्या पत्नीने थेट इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरपक्षाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही बाजूंची अधिकृत विधाने आणि पुरावे तपासण्याचे काम सुरू असून, चौकशीअंतीच अधिकृत माहिती समोर येईल. या धक्कादायक घटनेमुळे नाशिक शहरात एकच चर्चा रंगली असून इंदिरानगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.