नाशिक, (प्रतिनिधी) २६ ऑक्टोबर - कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्याचे आमिष दाखवून आणि अवघ्या दोन महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीपेक्षा जास्त नफा मिळवून देण्याचा बहाणा करून एका व्यावसायिकाला तब्बल ५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात नवी मुंबईतील एका कंपनी चालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशिल भगवान जुवेटकर (रा. नेरूळ, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिक कृष्णा गायकवाड (वय वर्ष/रा. वडजाईमाता नगर, मखमलाबाद नाका, नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जुवेटकर आणि तक्रारदार गायकवाड हे पूर्वपरिचित आहेत. संशयिताची नवी मुंबईतील नेरूळ एमआयडीसी परिसरात ‘सापवेद बेव्हरेजस प्रा.लि.’ नावाची कंपनी आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये संशयित जुवेटकर याने नाशिक येथे येऊन प्रतिक गायकवाड यांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान त्याने स्वतःच्या कंपनीच्या विस्तार व व्यवसायवृद्धीसाठी भांडवलाची गरज असल्याचे सांगून गायकवाड यांना गुंतवणुकीचा सल्ला दिला.
गुंतवणूक केल्यास कंपनीच्या संचालक मंडळात (Director Board) सन्मानपूर्वक वर्णी लावण्याचे आश्वासन त्याने दिले. याशिवाय अवघ्या ६० दिवसांत (दोन महिन्यांत) गुंतवलेल्या रकमेवर दुपटीहून अधिक नफा मिळवून देण्याची खोटी ग्वाही दिली. संशयिताच्या या सततच्या पाठपुराव्याला आणि जादा नफ्याच्या आमिषाला बळी पडत गायकवाड यांनी ५ लाख रुपये कंपनीत गुंतवले.
वर्ष उलटले तरी पैसे मिळाले नाहीत
मात्र, पैसे उकळल्यानंतर संशयिताने दिलेली आश्वासने हवेतच विरली. गुंतवणूक करून वर्षभराचा कालावधी उलटला तरी गायकवाड यांना नफ्याची रक्कम तर दूरच, मूळ ५ लाख रुपयेही परत मिळाले नाहीत. संशयिताकडून कोणतीही सकारात्मक दाद न मिळाल्याने आणि स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी अखेर पोलीस ठाणे गाठले.
गायकवाड यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित सुशिल जुवेटकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.