नाशिक, (प्रतिनिधी) ३० ऑक्टोबर - त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंड आणि नवीन घाट परिसरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा महत्त्वपूर्ण ध्वजारोहण सोहळा येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताच्या महामहिम राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविक आणि नागरिकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेचा उपाय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अन्वये नाशिकचे अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीचे मार्ग वळविण्याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
हा वाहतूक बदल ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत नियमित मार्गांवरील वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
असे असतील पाच प्रमुख पर्यायी मार्ग
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामीण व शहर पोलिसांनी केलेल्या संयुक्त नियोजनानुसार पुढीलप्रमाणे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत:
१. नाशिक ते त्र्यंबकेश्वर मुख्य मार्ग :
नाशिक - पिंपळगाव बहुला - संदीप फाउंडेशन - खंबाळे - पेगलवाडी फाटा मार्गे थेट त्र्यंबकेश्वर जाणारा पारंपरिक रस्ता पूर्णपणे बंद राहील. त्याऐवजी वाहने अमृत चौक - बारदान फाटा - गोवर्धन - गिरणारे - धोंडेगाव - देवरगाव - वाघेरा फाटा - अंबोली फाटा - सापगाव मार्गे त्र्यंबकेश्वरकडे वळवण्यात आली आहेत.
२. जव्हार-मोखाडा ते नाशिक मार्ग :
जव्हार - मोखाडा - अंबोली - त्र्यंबकेश्वर - पेगलवाडी - खंबाळे - संदीप फाउंडेशन मार्गे नाशिककडे येणारी वाहतूक जव्हार - मोखाडा - अंबोली टी-पॉइंट - वाघेरे फाटा - कोने - साप्ते - देवरगाव - गिरणारे - गोवर्धन मार्गे नाशिक शहरात प्रवेश करेल.
३. मुंबई बाजुकडून येणारी वाहने :
मुंबईकडून वैतरणा फाटा मार्गे पहिने - त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने वैतरणा फाटा - नाशिक - अमृत गार्डन - बारदान फाटा - गोवर्धन - गिरणारे - धोंडेगाव मार्गे त्र्यंबकेश्वर या मार्गाने रवाना केली जातील.
४. पहिने - पेगलवाडी ते नाशिक मार्ग :
पहिने व पेगलवाडी भागातून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पहिने - आहुर्ली - सांजेगाव - वाडीवऱ्हे मार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
५. पहिने - पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वर मार्ग :
स्थानिक पातळीवर पहिने ते त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या वाहनांना पहिने - भिलमाळ - निरगुड पाडा - जांभूळपाडा - सापगाव मार्गे त्र्यंबकेश्वर या मार्गाने प्रवास करावा लागेल.
सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीचे आदेश
वाहतूक वळवण्यात आलेल्या प्रस्तावित पर्यायी मार्गांवर दिशादर्शक फलक आणि वाहतूक चिन्हे (Traffic Signs) त्वरित बसवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) मोटार वाहन कायद्याच्या कलम ११६ अन्वये देण्यात आले आहेत.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या सर्व पर्यायी मार्गांची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या युद्धपातळीवर पूर्ण कराव्यात, जेणेकरून मार्गावर कोणताही अपघात अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई
अतिविशिष्ट व्यक्तींचा बंदोबस्त आणि हजारो भाविकांची सुरक्षा लक्षात घेता हे वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार हे निर्बंध शिथिल करण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत. या अधिसूचनेचे उल्लंघन करून पर्यायी मार्ग न वापरणाऱ्या वाहनचालकांवर 'भारतीय न्याय संहिता २०२३' (BNS) आणि 'मोटार वाहन कायदा १९८८' च्या विविध कलमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांनी, प्रवाशांनी आणि भाविकांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.