हायवेवरील टोल नाक्यावर पार्किंग आणि स्वच्छतागृह... केंद्र सरकारने काढले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 26-Oct-2026

 

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २६ ऑक्टोबर - राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणे (NHAI) अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशभरातील टोल प्लाझांमधील सार्वजनिक स्वच्छतागृह सुविधा आणि निर्धारित पार्किंग व्यवस्थांचा कायापालट करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता, सुरक्षा, सुलभता, अहोरात्र सेवा आणि स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित देखरेखीवर विशेष भर देण्यात आला आहे.

व्यापक दुरुस्ती आणि सुविधांचे नूतनीकरण

विद्यमान स्वच्छतागृहांची अवस्था सुधारण्यासाठी आधी त्यांचे तांत्रिक मूल्यमापन केले जाईल. यानंतर आवश्यकतेनुसार फरशा, नळजोडणी, स्वच्छताविषयक उपकरणे, पुरेशी प्रकाशयोजना, सांडपाणी निचरा व्यवस्था आणि स्पष्ट दिशादर्शक फलक बसवले जातील. तसेच वाहतुकीच्या प्रमाणानुसार नियमित स्वच्छतेचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे.

महिला व दिव्यांगांच्या सुरक्षेला प्राधान्य

रात्रीच्या वेळी थांबणाऱ्या कुटुंबांच्या आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत:

 * सुरक्षा व प्रकाशयोजना: परिसर आणि पार्किंग क्षेत्रात पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची नजर असेल.

 * महिलांसाठी सुविधा: सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स उपलब्ध करून दिल्या जातील.

 * दिव्यांग स्नेही सुविधा: प्रत्येक टोल प्लाझावर दिव्यांगांसाठी किमान एक अडथळा मुक्त 'सार्वत्रिक स्वच्छतागृह' (Universal Toilet) अनिवार्य असेल, जिथे आधारासाठी दांडे व योग्य प्रवेशद्वारे असतील.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग अन् आधुनिक पार्किंग

टोल नाक्यांच्या परिसरातील वाहनतळ (पार्किंग बे) सुधारून तिथे सुसज्ज जलनिस्सारण व्यवस्था केली जाईल. तसेच, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या पार्किंग क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग स्टेशन उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

स्मार्ट देखरेख, QR कोड अन् सेप्टिक टँकची यांत्रिक स्वच्छता

 * डिजिटल डॅशबोर्ड: दुर्गंध, पाण्याची उपलब्धता, सांडपाण्याची पातळी आणि वीज पुरवठा यावर डिजिटल डॅशबोर्डद्वारे केंद्रीय पातळीवरून स्मार्ट देखरेख ठेवली जाईल.

 * नागरिकांचा अभिप्राय: प्रवाशांना सुविधांबाबत तक्रार किंवा अभिप्राय नोंदवण्यासाठी 'राजमार्ग अॅप'शी जोडलेले QR कोड आणि टचस्क्रीन उपलब्ध असतील.

 * मानवी सफाईवर पूर्ण बंदी: सेप्टिक टाक्या आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांची स्वच्छता केवळ यांत्रिक पद्धतीनेच (मशीनद्वारे) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही मानवाला टँक किंवा मॅनहोलमध्ये उतरवण्यास सक्त मनाई आहे.

निष्काळजीपणा केल्यास आर्थिक दंड व कारवाई

सुविधांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी दैनंदिन ते वार्षिक पातळीवर ऑडिट केले जाईल. जर संबंधित कंत्राटदार सुविधांची योग्य देखभाल करण्यात अपयशी ठरला, तर त्याला आर्थिक दंड ठोठावला जाईल आणि वारंवार निष्काळजीपणा आढळल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल.

 

Comments

No comments yet.