नाशिकमध्ये सुरू होणार या मोठ्या ब्रँडचे स्टोअर... गुंतवणूक आणि रोजगाराचीही संधी...

Share:
Main Image
Last updated: 26-Oct-2026

 

विकास नाशिककर, (नाशिक) २६ ऑक्टोबर - नाशिक जिल्ह्याच्या रिटेल आणि व्यापारी क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत आहे. देशातील आघाडीची रिटेल आणि फूड प्रोसेसिंग कंपनी असलेल्या ‘पटेल रिटेल लिमिटेड’ने (Patel Retail Limited) नाशिक जिल्ह्यात अधिकृत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या नवीन विस्तार योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या घोटी येथे भव्य रिटेल स्टोअर सुरू केले जाणार आहे. या नव्या दालनामुळे पटेल रिटेलचा विस्तार आता महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक अशा चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी पटेल रिटेलचे पहिले पाऊल

पटेल रिटेल लिमिटेडचे सध्या विविध भागात ५४ पेक्षा अधिक स्टोअर्स कार्यरत आहेत. मात्र, नाशिक जिल्हा हे कंपनीसाठी संपूर्णपणे नवीन आणि महत्त्वाचे बाजारपेठीय केंद्र ठरले आहे. घोटी येथील प्रस्तावित स्टोअर हे नाशिक जिल्ह्यातील कंपनीचे पहिलेच दालन असेल. याशिवाय कंपनी रायगड जिल्ह्यातील माणगाव/महाड परिसरातही आपले नवीन स्टोअर सुरू करत आहे.

घोटी हे ठिकाण मुंबई-नाशिक महामार्गावरील अत्यंत गजबजलेले आणि वेगाने विकसित होणारे व्यावसायिक केंद्र आहे. या ठिकाणी सुसज्ज आणि संघटित रिटेल (Organised Retail) दालन सुरू झाल्यामुळे घोटी शहरासह इगतपुरी तालुका आणि सभोवतालच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक खरेदीचा अनुभव मिळणार आहे.

एकाच छताखाली सर्व सोयी-सुविधा

घोटी येथील नवीन स्टोअरमुळे नाशिककरांना आणि स्थानिक नागरिकांना उच्च दर्जाचा किराणा माल, ताज्या दैनंदिन वस्तू, गृहोपयोगी उत्पादने तसेच वाजवी दरातील दर्जेदार पर्याय उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या ‘इंडियन चस्का’ (मसाले), ‘पटेल फ्रेश’ (डाळी व ड्रायफ्रूट्स) आणि ‘पटेल इसेन्शियल’ (स्वच्छता व गृहोपयोगी उत्पादने) यांसारख्या प्रसिद्ध इन-हाउस ब्रँड्सची उत्पादने येथे थेट ग्राहकांसाठी उपलब्ध केली जातील. याशिवाय, कंपनीच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना घरपोच मोफत डिलिव्हरीची सुविधाही मिळणार आहे.

“ग्राहकांच्या जवळ जाण्याचा आमचा प्रयत्न” — धनजी पटेल

या विस्ताराबाबत बोलताना पटेल रिटेल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक धनजी पटेल यांनी सांगितले की, “आम्ही उपनगरीय आणि वेगाने प्रगती करणाऱ्या बाजारपेठांमध्ये संघटित रिटेल क्षेत्राचा विस्तार करत आहोत. नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील नवीन स्टोअर हा आमच्या 'क्लस्टर-बेस्ड' (घटकानुसार विस्तार) धोरणाचा एक भाग आहे. या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांना अधिक उत्तम, सोयीस्कर आणि दर्जेदार खरेदीचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना

नाशिक जिल्हा हा कृषी आणि उद्योगांचा मेळ असलेला भाग आहे. घोटीमध्ये पटेल रिटेलचे दालन सुरू झाल्यामुळे केवळ ग्राहकांनाच फायदा होणार नाही, तर स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागात संघटित रिटेल संस्कृती रुजल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Comments

No comments yet.