कुंभमेळ्याच्या उंबरठ्यावर नाशिकमध्ये महाप्रदूषणाचा स्फोट... अंबडनंतर आता येथेही आढळले कर्करोगजन्य 'हेक्साव्हॅलेंट क्रोमियम'...

Share:
Main Image
Last updated: 26-Oct-2026

 

मनोहर शिंदे, (नाशिक) २६ ऑक्टोबर - अंबड औद्योगिक वसाहतीतील (दत्तनगर) भूगर्भातील पाण्यात सापडलेल्या मानवी शरीरास अत्यंत घातक व कर्करोगजन्य मानल्या जाणाऱ्या 'हेक्साव्हॅलेंट क्रोमियम' (Hexavalent Chromium) या विषारी रसायनाची व्याप्ती आता केवळ बोअरवेलपुरती मर्यादित राहिलेली नसून ती थेट वाहत्या जलस्रोतांपर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंदिनी (नासर्डी) नदीला मिळणारा नाला आणि टाकळी येथील नंदिनी-गोदावरी नदीच्या पवित्र संगमावरील पाण्याच्या नमुन्यांमध्येही 'हेक्साव्हॅलेंट क्रोमियम' विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याचे अधिकृत प्रयोगशाळा चाचणीतून समोर आले आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण नियोजित असताना, पवित्र गोदावरी नदीपर्यंत विषारी रसायने पोहोचल्याने पर्यावरण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या संदर्भात पर्यावरण कार्यकर्त्यांनी तातडीने अधिकृत निवेदन व प्रसिद्धीपत्रक जारी करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), नाशिक महानगरपालिका (NMC) आणि जिल्हा प्रशासनाच्या गूढ मौनावर व अपारदर्शकतेवर कडक ताशेरे ओढले आहेत.

बोअरवेलमध्ये १,००० पटींहून अधिक विष, तर संगमावरही अस्तित्व

अंबड दत्तनगर येथील बोअरवेलच्या पाण्याच्या तपासणीत हेक्साव्हॅलेंट क्रोमियमचे प्रमाण तब्बल ५०.३ मिग्रॅ/लिटर (mg/L) इतके भयंकर आढळले होते. हे प्रमाण भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) कमाल मर्यादेपेक्षा १,००० पटीहून अधिक आहे. वास्तविक पाहता, पिण्याच्या अथवा वापराच्या पाण्यात हे रसायन अजिबात असता कामा नये.

त्यानंतर नागरिकांनी पुढाकार घेऊन केलेल्या पुढील तपासणीत 'अश्वमेध इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स'च्या चाचणी अहवालानुसार (रिपोर्ट क्र. W/10/26/0475, दि. २४ ऑक्टोबर २०२६) टाकळी येथील नंदिनी-गोदावरी संगमावर हेक्साव्हॅलेंट क्रोमियमचे प्रमाण ०.१० मिग्रॅ/लिटर इतके नोंदवले गेले आहे. तसेच अंबड एक्सएलओ पॉईंट नाल्यामध्ये हे प्रमाण ०.१५ मिग्रॅ/लिटर (रिपोर्ट क्र. W/10/26/0373) आढळले आहे. काही रासायनिक कारखाने बंद केल्यानंतरही वाहत्या नद्यांच्या पात्रात हे विष कायम असणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

नागरिकांना त्वचेचे अल्सर; १५ वर्षांपासून दुर्लक्ष

या दूषित भूजलाचा वापर दैनंदिन कामांसाठी केल्यामुळे परिसरातील रहिवासी, विशेषतः लहान मुलांच्या त्वचेवर खोल आणि दाहक जखमा (Chemical Ulcers) झाल्या असून लिम्फ नोड्सना सूज आली आहे. एमपीसीबीच्या स्वतःच्या २०११ आणि २०१२ मधील जुन्या अहवालांवरून (दत्तनगरमधील विहिरींचे पाणी परीक्षण) या भागात क्रोमियमची गळती होत असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मागील १५ वर्षांपासून होती, हे सिद्ध होते. तरीही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पर्यावरण कार्यकर्त्यांच्या प्रशासनाकडे प्रमुख मागण्या:

राष्ट्रीय हरित लवादातील (NGT) याचिकाकर्ते राजेश पंडित, रोशन केदार, प्रवीण शिलावट, दत्तू ढगे आणि 'सांडआरपी'च्या (SANDRP) परिणीता दांडेकर यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:

 * संपूर्ण व्याप्ती जाहीर करा: अंबड आणि सातपूर औद्योगिक पट्ट्यातील या विषारी प्रवाहाचा (Plume) भूजल-वैज्ञानिक (Hydrogeological) अभ्यास करून माती, उथळ व खोल भूजल आणि नद्यांवरील परिणामांची व्याप्ती जनतेसमोर मांडावी.

 * शासकीय लॅब अहवाल खुले करा: जून २०२६ पासून शासकीय यंत्रणांनी घेतलेले पाणी, माती, नदीपात्रातील गाळ (Sediments), शेतीमाल आणि दुभत्या जनावरांच्या दुधाचे तपासणी अहवाल तात्काळ अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत.

 * सक्तीने रक्त-लघवी तपासणी: बाधितांना केवळ वरवर मलम न देता, त्यांचे 'Whole Blood Chromium' आणि 'Urine Chromium' सारखे सखोल जैविक परीक्षण करून अहवाल समोर आणावेत.

 * कारखान्यांची वस्तुस्थिती व कारवाई: अंबड-सातपूरमधील तपासणी केलेल्या उद्योगांची यादी, सांडपाणी भूगर्भात सोडणारा नेमका मार्ग (रिव्हर्स बोरिंग, अनधिकृत तळी इ.) स्पष्ट करून जबाबदार घटकांवर कठोर फौजदारी कारवाई करावी.

 * साप्ताहिक हेल्थ बुलेटिन: आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि लाखो भाविक-स्थानिकांचे आरोग्य लक्षात घेऊन प्रशासनाने दर आठवड्याला प्रत्यक्ष कृतीचा आणि पाण्याच्या गुणवत्तेचा साप्ताहिक स्थिती अहवाल (Weekly Public Bulletin) जारी करावा.

 

Comments

No comments yet.