नाशिक शहराच्या वाहतुकीत मोठे बदल... हे मार्ग पूर्णपणे बंद...

Share:
Main Image
Last updated: 27-Oct-2026

 

केशव खेडकर, (नाशिक) २६ ऑक्टोबर - ऐतिहासिक व पवित्र रामतीर्थ आणि गोदाघाट परिसरात ३० आणि ३१ तारखेला होणाऱ्या भव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपतींसह अनेक साधू-महंत, व्हीव्हीआयपी (VVIP), विविध पक्षांचे राजकीय नेते आणि देशभरातून येणारे लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यादरम्यान रामतीर्थ व गोदाघाट परिसर पूर्णपणे ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आला असून, वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी वाहतूक मार्गातील बदलांची विशेष अधिसूचना जारी केली आहे.

३० ऑक्टोबरला धर्मध्वज मिरवणूक : ‘या’ मार्गांवर निर्बंध

शुक्रवार, ३० ऑक्टोबर आणि शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते मिरवणूक पूर्णपणे संपेपर्यंत विविध मार्गांवर वाहतुकीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तपोवन मैदान येथून निघणारी धर्मध्वज मिरवणूक आठवण लॉन्स, तपोवन क्रॉसिंग, पंचमुखी हनुमान मंदिर, काट्या मारुती चौक, देवी चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल आणि अहिल्याबाई होळकर पुलामार्गे रामतीर्थापर्यंत पोहोचणार आहे. या मार्गावर मिरवणुकीतील वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या सामान्य वाहनांना प्रवेशास सक्त मनाई असेल.

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणारे मार्ग:

मिरवणूक कालावधीत खालील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील:

अशोक स्तंभ ते रविवार कारंजा

रेडक्रॉस ते धुमाळ पॉईंट

मालेगाव स्टँड ते मखमलाबाद नाका

दिंडोरी नाका ते मालेगाव स्टँड

वाहतुकीसाठी करण्यात आलेले पर्यायी मार्ग

नागरिक आणि वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. वाहनधारकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

१. दिंडोरी नाका ते गंगापूर नाका मार्ग:

दिंडोरी नाका – पेठ नाका – मखमलाबाद नाका – गोदा पार्क – गजभिये पेट्रोल पंप मार्गानी वाहने गंगापूर नाक्याकडे जाऊ शकतील.

२. सीबीएस ते अमृतधाम मार्ग:

सीबीएस – मेहेर सिग्नल – अशोक स्तंभ – जुना गंगापूर नाका – फडोळ चौक – बाजार समिती सिग्नल मार्गे अमृतधाम चौकाकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध राहील.

३. पेठनाका व दिंडोरी नाका ते शहर मार्ग:

पेठनाका – कृषी उत्पन्न सिग्नल – तारवाला सिग्नल – अमृतधाम चौक

मिरची चौक – दिंडोरी नाका – तारवाला सिग्नल – अमृतधाम चौक – मिरची चौक

४. द्वारकाकडून बळी मंदिराकडे जाणाऱ्यांसाठी:

द्वारका परिसरातून बळी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनधारकांनी उड्डाणपुलाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांना आणि भाविकांना प्रशासनाचे आवाहन

या सोहळ्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी सर्व नागरिक, स्थानिक रहिवासी आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीचे हे बदल लक्षात घेऊनच आपल्या मार्गाची निवड करावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

 

Comments

No comments yet.